Saturday, May 4, 2024
Homeधुळेकोरोना अन् योगा

कोरोना अन् योगा

दि.21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. खरे तर योगाही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. पतंजली ऋषींनी दिलेली ही साधना हजारो वषार्ंपासून मानवाला सुदृढ व निरोगी आरोग्य प्रदान करीत असून आता योग घराघरात पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने जागतिक पातळीवर योग दिन साजरा होतो आहे. योग दिनानिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी योगवर्ग आयोजित करण्यात आले असून या साधनेबद्दल हा अल्पसा शब्द प्रपंच.

आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी या दोन मनुष्यजातीची निर्वाज्य सेवा करणार्‍या अर्थात मानवी आरोग्यासाठी उपकारक उपचारपद्धतींना धरुन गेल्या काही दिवसांपूर्वी नाहक मोठा वाद निर्माण झाला. तो अजूनही पूर्ण शमलेला नाही. त्यात आयुर्वेदाच्या बाजूने पोटतिडकीने बोलणारे बाबा रामदेव हे नावाजलेले योग गुरु असल्याने मुळात कैवल्याचा मार्ग असलेला योगही त्यात भरडला गेला. मात्र उपचारपद्धती कोणतीही असो, ती मानवाला वरदानच आहे असे माझे ठाम मत आहे. फक्त ती राबवणारे हात कशासाठी आणि कोणासाठी काम करतात यावर तिचा उपयोग अवलंबून आहे, असो.

- Advertisement -

योग सुद्धा अलीकडे उपचारपद्धती होऊ लागली आहे. किंबहूना अलीकडे योगाभ्यास करणार्‍या अनेक लोकांचा उद्देशच मुळी शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवणे हा असतो. भारताच्या आयुष विभागाने देखील आयुर्वेद, युनानी, सिद्ध व होमिओपॅथीबरोबर योगा थेरपीला चालना दिल्याचे दिसते. हळूहळू योग एक उपचार पद्धती म्हणून विकसीत होतांना दिसते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेदाच्या वाद हा आपला विषय नाही. आपल्याला त्या भानगडीत सुद्धा पडायचे नाही. मात्र एरवी अ‍ॅलोपॅथीसह सगळ्याच मुख्य धारेतील उपचारपद्धतीच्या मर्यादा कोरोनाने अधोरेखित केल्या आहेत, हे मात्र आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोग्यासाठी आता काय करता येईल? हा प्रश्न जगाला भेडसावतो आहे. या प्रश्नाचे उत्तर, स्वतःला इतके सशक्त बनवणे आहे की कोरोना सारखी कोणत्याही आजाराची लाट आली तरी त्याचा संसर्ग आपल्याला होणार नाही. योग थेरपी सरसकट अ‍ॅलोपॅथीसारखा उपचार करु शकणार नाही. मात्र बेस्ट प्रिव्हेंटीव्ह रेमेडी म्हणून नक्कीच उपयोगी ठरु शकते. उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ (झीर्शींशपींळेप ळी लशीींंशी ींहरप र्लीीश) असे एक इंग्रजी सुभाषित आहे. अर्थातच प्रिव्हेटीव्ह मेडीसीन म्हणून योगाकडे यासाठी आश्वासक दृष्टीने बघता येईल. खरेतर योगात आहार संकल्पना सुद्धा छान स्पष्ट केलेली आहे पण तरीही योगाबरोबर आयुर्वेदाचा मिलाफ म्हणजे दुग्धशर्करा योग ठरु शकेल. कोरोनासाठी हा दुग्धशर्करा योग रामबाण उपाय ठरु शकतो.

कोरोना म्हणजे कोव्हीड 19 हा आजार सार्स कोव्हिड 2 व्हायरस स्ट्रेनच्या संसर्गामुळे होतो. मानव शरीरातील पेशीमधे एसीई 2 नावाच्या प्रोटीन्सच्या माध्यमातून त्याचा प्रादुर्भाव सुरु होतो. त्यामुळे योग्य ज्ञान नसतांना उतावीळ होऊन कोरोनाने काही होत नाही. तो तर साधा कफविकार आहे, वगैरे विधान करणार्‍या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, कोरोना विषाणूचा संसर्ग हा काही सामान्य कफदोष नाही. कोरोनाचे इतरही अनेक लक्षणे आतापुढे आले आहेत. त्यामुळे अशा लक्षणांनाच कोरोना समजून प्रतिबंध करण्यासाठी मात्र चुकीच्या पद्धतीने योगा किंवा वैकल्पिक चिकित्सा करणे अंधारात तीर मारण्यासारखे होईल. वस्तुस्थिती अशी आहे की कोरोना संसर्गजन्य व विषाणूमुळे होणारा आजार आहे. जोपर्यंत त्यावर औषध सापडत नाही तोपर्यंत त्याचा संसर्ग टाळणे आणि योग व आयुर्वेदाने शरीर स्वस्थ व प्रतिकारक्षम ठेवणे हाच मुख्य व महत्वाचा उपाय आहे. जागतिक आरोग्य संघटना व शासनाने घालून दिलेले सोशल डिस्टंसिंगचे नियम, तोंडावर मास्क, साबणात एमिफिफिल्स असते ते कोरोनाचे स्ट्रक्चर उद्ध्वस्त करते म्हणून हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुणे व सॅनिटाईझेशन हे प्राथमिक प्रतिबंधक उपाय आहेत. याशिवाय कोरोना होऊ नये आणि झालाच तर आरोग्य कसे सांभाळावे, कोणतेही दुष्परिणाम होऊ नये यासाठी काय करावे याचे अनुभवजन्य प्रयोग योगातील जलनेती सारख्या शुद्धीक्रीयांच्या माध्यमातून पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे विख्यात डॉ.धनंजय केळकर व अनेक तज्ज्ञ व्यक्ती गेल्या वर्षापासून करीत आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांबरोबर राहून सुद्धा त्यांना स्वतःला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही हे विशेष. कोरोना होऊ नये किंवा झालाच तर नंतर कोणती काळजी घ्यावी, काय खावे, प्यावे, योगाभ्यास कसा व कोणता करावा याचे कृतीशील मार्गदर्शन योग क्षेत्रातील अनेक लोक करीत आहेत. कोरोनाचे विषाणू श्वासाच्या माध्यमाने नाकात शिरतात मात्र तेथे असलेले हेअर फोलिकल्स आणि गोब्लेट सेल्समुळे या विषाणूला सर्वप्रथम तिथेच अटकाव होतो. त्यानंतरही तो साधारणतः एक आठवडा घश्यातच डेव्हलप होत असतो असे डॉ.धनंजय केळकर म्हणतात. आपण असे म्हणू की एक दिवस जरी हे विषाणू तिथून खाली फूफ्फुसात उतरत नसेल तरी त्याला तिथून पुन्हा बाहेर काढून टाकायला हटयोगातील षटकर्मापैकी जलनेती व कपालभाती या क्रिया खूप फायद्याच्या आहेत असे आढळून आले आहे. या क्रिया अतिशय सोप्या असून कोणीही निरोगी व्यक्ती सहजपणे करु शकते. कोरोनासदृष्य वातावरणात आता प्रत्येकाने रोजच या क्रिया केल्या तरी त्यांचा कोरोनापासून बचाव व्हायला मदत होऊ शकेल. इतर वेळी कफदोषात व श्लेष्मल पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि प्राणायामपूर्व प्रक्रिया म्हणून योगात या क्रियेंचा उपयोग केला जातो. मात्र कोरोना काळात विषाणूला फुफ्फुसात शिरण्याच्या आधीच बाहेर काढून टाकण्यासाठी या क्रिया विशिष्ट पद्धतीने केल्या जातात.

सुर्यनमस्कार, योगासने व प्राणायामाचा नियमीत अभ्यास तसेच योग निद्रा आणि ध्यानादी क्रिया, आहार- विहार शुचिता यांच्याकडे सुद्धा संशोधनात्मक वृत्तीने व कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून बघण्यासाठी योग्य बदल आवश्यक आहेत. ते कोरोनाचा संशय असलेल्या केसेसमधे प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे वेगळे ठरवता येते. कारण आसन, प्राणायाम आदी योगाभ्यासाच्या क्रिया आता फक्त आध्यात्मिक नव्हे तर शरीर व मनाच्या शुचिर्भूत होण्यासाठी अर्थात उपचारात्मक पद्धती म्हणून वापरता येतात यावर अनेक प्रयोग झालेले आहेत. त्यातील योग्य त्या क्रिया योग्य मार्गदर्शनात केल्यास स्ट्रोक व्हॉल्यूम व कार्डीयाक आऊट-पूट वाढतो. कार्डीयाक स्नायू पूर्ण ताकद व क्षमतेने कार्य करु लागतात. एंडोक्राईन बॅलन्स सुधारतो. त्यामुळे आयुष विभागाने सुद्धा खास कोरोनावर योग आणि आयुर्वेद कसे कार्य करते हे बघायला सुरुवात केली आहे. दिल्लीत एम्स, राम मनोहर लोहिया आणि राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे यावर संशोधन सुरु आहे. याचे शास्त्रोक्त प्रयोग करण्यासाठी योग वैज्ञानिकांना अर्थसाहाय्य सुद्धा आयुष विभाग पुरवते आहे.

वैकल्पिक चिकित्सेत होमिओपॅथी, क्युप्रेशर, सुजोक किंवा विदेशातील काही चिकित्सा पद्धती तसेच आयुर्वेदात तर अनेक वैद्य, हकीम व परंपरेने औषधे देणारे लोक आहेत. ते निरनिराळे काढे, गोळ्या, चूर्ण, तेलापासून थेट कोरोनील कीट नावाच्या पतंजलीच्या उत्पादनापर्यंत प्रत्येक जण कोरोनावर रामबाण उपाय असल्याचे दावे करतात. मात्र जागतिक आरोग्य संघटना व भारत सरकारच्या आरोग्य विभागाने अजून तरी कोणालाही अधिकृत मान्यता दिलेली नाही. याचा अर्थ ते सगळे उपाय टाकाऊ आहेत असा होत नाही. मात्र त्याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. सरसकट सगळ्यांना सारखेच लागू होतील अशी रचना अ‍ॅलोपॅथीप्रमाणे अन्य पॅथी किंवा पारंपारीक औषधांची नाही. क्लिनिकल ट्रायल्स हाच एक निकष नाही तर त्यांची संशोधन पद्धती व मापदंड वेगळे आहेत. आपआपल्या उपचारपद्धतीची उत्तम जाण असलेला जाणकार योगा थेरपीस्ट डॉक्टर किंवा वैद्य असेल तर तो रुग्णाच्या समस्येवर योग्य उपचार करु शकतो.

सायंटोमेट्रीक्स जर्नलमधे प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव आपल्या देशात आहे. मात्र या विषाणूवर शास्त्रीय संशोधन करण्यात आपल्या देशाचा वाटा अवघा सात टक्के आहे याचे कारण हेच आहे. आपण पूर्ण शास्रोक्त मार्गाने जात नाही किंवा पूर्ण पारंपारिक मार्गही निवडत नाही. संशोधनाच्या दृष्टीने आपले व्हिजन तयार नाही. कोणत्याही आजार, त्रास किंवा संसर्गाला खूप सहज घेतो. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अमर्याद फोफावली. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. कोरोनासारख्या जागतिक आणि मोठ्या संकटाशी सामना करतांना योगाचा प्रभावी उपयोग करुन घ्यायला हवा. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या या महान योग विद्येवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या योगाचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु आहे. योगासारख्या कृतीशील शास्त्राचे अर्थात नियमित योगा क्लासेस सुद्धा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सुद्धा ऑनलाइन आयोजित केला जातो आहे. विविध वेबीनार, योगासन स्पर्धा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध योग गुरूंच्या व्याख्यानाचे कार्यक्रम ऑनलाइन आयोजित केले जात आहेत. विशेष म्हणजे अशा कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह, यु ट्यूब लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा मोफत होत आहे. या आठवड्यात मला स्वतःला योग प्रशिक्षक म्हणून 22 ठिकाणी ऑनलाइन कार्यक्रमाचे निमंत्रण आहे.

डॉ.राजेंद्र निकुंभ, धुळे (7020530759)

- Advertisment -

ताज्या बातम्या