देशभरात कोरोनाकाळात सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू होत असताना रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं, कोरोना कधी आटोक्यात येणार, देशात कोरोनाच्या सामुहिक संसर्गाला सुरूवात झाली आहे का, कोरोनाला रोखण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत का याबाबत ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य आणि ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलेल्या मतांचा मागोवा.
डॉ. रणदीप गुलेरिया, संचालक, एम्स
देशभरात रुग्णांची संख्या वाढत असली तरी जवळपास 70 ते 80 टक्के रुग्ण कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असणार्या आठ ते दहा शहरांमध्येच आहेत. मात्र उर्वरित देशाचा विचार केला तर तिथे कोरोनाचा सामुहिक संसर्ग झालेला नाही. कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ असणार्या शहरांमध्ये स्थानिक पातळीवर काही प्रमाणात संसर्ग झाल्याची किंवा होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसते. म्हणूनच या भागातला स्थानिक पातळीवरचा संसर्ग रोखण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन किंवा उपाययोजना करणं आवश्यक आहे. मात्र संपूर्ण देशभरात सामुहिक संसर्गाचा धोका निर्माण झालेला नाही हे मी नक्कीच सांगू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोना रुग्णांना शोधून विलगीकरणात ठेवण्याचं धोरण अवलंबणं आजघडीला अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने हे अत्यंत सुयोग्य असं धोरण म्हणता येईल. आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या धोरणानुसारच यापुढे काम सुरू राहील. जुलै महिन्यात कोरोना विषाणूचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. कोरोनाचा आलेख चढाच राहणार का खाली येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण भारताबद्दल बोलायचं तर पुढील काही काळ कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे. अर्थात संपूर्ण जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल का, याबाबत स्पष्टपणे काहीच सांगता येणार नाही. मात्र काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण याबाबत आशावादी राहू या.
यापुढील काळात विविध विभागांमधला कोरोनावाढीचा वेग सारखा नसेल. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल तर काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागेल. दक्षिणेतली काही शहरं, अहमदाबाद, पुणे अशा शहरांमध्ये कोरोनाचा आलेख घसरू लागला आहे. दुसरीकडे दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये रुग्ण वाढत चालले आहेत. मात्र योग्य नियोजन तसंच आक्रमक पद्धतीने औषधोपचाराचं धोरण राबवल्यास कोरोनाचा शहरांमधला प्रकोप कमी होईल आणि पुढील काही आठवड्यांमध्ये इथल्या रुग्णसंख्येमध्ये घट होऊ लागेल, अशी आशा करू या. भारतातच नाही तर जगभरात आपल्याला असंच चित्र दिसतं. अमेरिकेत कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली आहे. त्यातही न्यूयॉर्कमध्ये रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे.
पुढचे दोन ते तीन महिने पावसाळा असेल. या काळात कोरोनाची स्थिती कशी असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मला वाटतं की, पावसाळ्याचा कोरोनावर कोणताही परिणाम होणार नाही. याआधी उन्हाळ्यात कोरोनाचं प्रमाण कमी होईल, असं बोललं जात होतं. कडक उन्हात आणि उच्च तापमानात कोरोना विषाणू तग धरू शकणार नाही, असं अनेकांना वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.
मात्र या काळात वैद्यकीय तज्ज्ञांचं कौशल्य पणाला लागणार आहे. पावसाळ्यात इतर आजार डोकं वर काढतात. डासांमुळे उद्भवणार्या डेंग्यू, चिकनगुन्या, मलेरिया अशा आजारांचं प्रमाण वाढतं. अंगदुखी, सर्दी-खोकला, तापाच्या तक्रारींमध्ये वाढ होते. हीच कोरोनाची लक्षणं असल्यामुळे आजाराचं अचूक निदान करून योग्य औषधोपचार करण्याचं आव्हान डॉक्टरांपुढे असेल.
कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा या विषाणूची लागण होऊ शकते का, कोविडची लागण झाल्यामुळे शरीरात कोरोनाविरोधी प्रतिकारक्षमता निर्माण होईल का, यासारखे प्रश्नही विचारले जातात. कोरोनातून बरं झाल्यानंतर पुन्हा हा आजार होण्याची किंवा कोरोनाची गंभीर लक्षणं दिसण्याची फारशी शक्यता नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरात काही प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात आणि या अँटीबॉडिजमुळे शरीरात काही प्रमाणात प्रतिकारक शक्ती निर्माण होते. ही प्रतिकारशक्ती कोरोनाला रोखते. तसंच काही कारणामुळे कोरोना रुग्णाशी संपर्क आल्यास सौम्य स्वरुपाची लक्षणं दिसू शकतात. अर्थात कोरोनाविरोधातली ही प्रतिकारशक्ती किती काळ टिकते याबाबत स्पष्टपणे काहीच सांगता येणार नाही. मात्र या प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाविरोधात संरक्षण मिळू शकतं आणि कोरोनातून बरे झालेल्यांना हा आजार पुन्हा जडण्याचा धोका खूप कमी असतो, असं मी निश्चितपणे सांगू शकतो.
विलगीकरणाबाबतही काही प्रमाणात संभ्रम आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असणार्यांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेणं योग्य ठरतं का, हा प्रश्न बरेचजण विचारतात. याबाबत दोन गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत रूग्णासह कुटुंबातल्या इतर सदस्यांनीही काळजी घेणं गरजेचं असतं. कोरोनाची सौम्य लक्षणं असणार्यांना फार त्रास होत नसेल तर ते घरातच विलगीकरणात राहू शकतात. अर्थात तुमच्या घरात विलगीकरणात राहता येण्यासारखी सोय हवी. वेगळी खोली, स्वच्छतागृह असायला हवं.
कोरोना रुग्णाची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्यामुळे असा एखादा सदस्य तुमच्या कुटुंबात असायला हवा. तसंच तुम्ही सतत डॉक्टरांच्या संपर्कात असणं आवश्यक आहे. यामुळे त्रास वाढल्यास तुम्हाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं. घरातच विलगीकरणात राहणार्यांनी कुटुंबातल्या सदस्यांना किंवा परिसरातील लोकांना आपल्यामुळे कोरोनाची लागण होणार नाही, आपल्यामुळे कोरोना पसरणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी. म्हणूनच अशा रुग्णांनी सामाजिक भान राखत विलगीकरणाच्या कठोर नियमांची अंमलबजावणी करायला हवी.
स्वत:सोबत इतरांचंही संरक्षण करणं ही आज प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच गर्दीच्या किंवा दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहणार्यांनी सौम्य लक्षणं असली तरी रुग्णालयात किंवा विलगीकरण कक्षात दाखल व्हायला हवं. घरात विलगीकरणात राहणार्या कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, अस्वस्थता जाणवू लागली, छातीत दुखू लागलं किंवा खूप थकवा जाणवत असेल किंवा अन्य काही वेगळी लक्षणं जाणवू लागली तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा. कोणताही हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. शरीरातली ऑक्सिजनची पातळी घसरणं खूप धोकादायक असतं. निरोगी माणसाच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी 97 च्या आसपास असते.
मात्र कोरोना रुग्णाच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा खाली गेली तर हा धोक्याचा इशारा समजावा. बाजारात ऑक्सिमीटर्स मिळतात. त्यांची किंमतही फार नाही. त्यामुळे कोरोना रुग्णाची ऑक्सिजन पातळी सतत तपासत रहायला हवं. कोरोनातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर रुग्णांनी नेहमीचा सकस आहार घ्यायला सुरूवात करावी. सौम्य स्वरूपाचा व्यायाम करून रोगप्रतिकारक्षमता वाढवावी. टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य आयुष्य जगायला सुरूवात करावी. कोरोनातून बरं झाल्यानंतही काही रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. अशा रुग्णांनी तपासणी करून योग्य ते औषधोपचार घ्यावेत. इतरांनी याआधी नमूद केल्याप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगायला सुरूवात करावी. बर्या झालेल्या रुग्णांना मानसिक आधाराची आवश्यकता असते. असा आधार मिळाल्यास रुग्ण नेहमीचं आयुष्य लवकर जगू लागतो.
कोरोनाकाळात विमानप्रवास, रेल्वेप्रवासादरम्यान स्वत:ला जपायला हवं. कोणत्याही परिस्थितीत मास्क घालूनच प्रवास करायला हवा. सातत्याने साबणाने हात धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. मास्क किंवा फेस शिल्डमुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो. बरेचदा कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत.
अशा लक्षणं न दिसणार्या रुग्ग्णांकडून कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र मास्कमुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका खूप कमी होतो. कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे मधुमेही, उच्च रक्तदाबासारखे आजार असणार्यांनी सर्वतोपरी काळजी घेऊन कार्यस्थळी जायला हवं. त्यातच मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. मास्क घातल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळत असलं तरी मास्क हा सामाजिक दुराव्याला पर्याय असू शकत नाही. मास्क घालून गर्दीत मिसळणं योग्य नाही. सामाजिक दुरावा आणि मास्क या दोहोंचं संतुलन साधलं जाणं आवश्यक आहे. सध्याच्या काळात सामाजिक दुरावा राखणं अत्यंत आवश्यक आहे.