Friday, May 24, 2024
Homeनगरकरोनाचे 4 कोटी रुपये माघारी

करोनाचे 4 कोटी रुपये माघारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या जागतिक महासंकटात बळी पडलेल्या मृतांच्या वारसांची, करोना एकल महिलांची फरफट अजूनही थांबलेली नाही. करोना मृतांच्या वारसांना देय 50 हजार रुपयांचे सहाय्यक अनुदान मंजूर होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही अनुदानाचे पैसे बँक खात्यात जमा व्हायला तयार नाहीत. याबाबत बँका व सरकारी यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांचे 4 कोटी रुपये बँकांमधून परत सरकारी तिजोरीत गेले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत निवेदन देऊन त्यांच्याकडे लक्ष वेधले आहे. विभागीय महसूल आयुक्त राधाकिसन गमे यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने करोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये सहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या वारसांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अर्ज मंजूर होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही अनेक वारसांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. यासाठी वारसदार, करोना एकल महिला, त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारून आता वैतागले आहेत.

मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागात याबाबतचे कामकाज केंद्रित झालेले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली तर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंगुलीनिर्देश करतात. तर जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालयाकडे बोट दाखवित आहे. अर्जदार, लाभार्थी मात्र या दोघांच्या कात्रीत भरडले जात आहेत.

दरम्यान जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन (मंत्रालय) व बँकांमध्ये ताळमेळ, सुसंवाद, समन्वय नसल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नसल्याची तक्रार मिलिंदकुमार साळवे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे. सरकारी यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील एका यादीतील 874 जणांचे सुमारे 4 कोटी रुपये खाते क्रमांकातील चुका व इतर कारणांमुळे बँकामधून पुन्हा सरकारी तिजोरीत परत गेल्याचे श्री. साळवे यांनी सांगितले.

पतीचे निधन झाल्यानंतर केलेला अर्ज मंजूर झाला आहे. बँक खाते अपडेट होऊन अनुदान जमा होण्यासाठी मी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दोन वर्षांत अर्ज दिले आहेत. पण अजूनही पैसे बँकेत जमा झालेले नाहीत.

लता पुंजा चौधरी, गोंधवणी, श्रीरामपूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या