Thursday, November 21, 2024
Homeसंपादकीयकोरोना कोणासाठी अतिघातक ?

कोरोना कोणासाठी अतिघातक ?

कोविड-19 चा प्रकोप वाढत असताना ज्या व्यक्तींना हृदय, श्वसनयंत्रणा यासंबंधीचे आजार आधीपासूनच आहेत किंवा मधुमेहाने जे ग्रस्त आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. कारण आधीपासूनच आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका निरोगी माणसांच्या चौपट असतो. एवढेच नव्हे तर अशा व्यक्तींच्या जिवालाही अन्य रुग्णांच्या तुलनेत कितीतरी अधिक धोका असतो. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असताना अशा व्यक्तींनी नियमांचे अधिक कसोशीने पालन करायला हवे.

डॉ. संजय गायकवाड

- Advertisement -

कोरोनाचा विषाणू जेव्हा नाक, तोंड किंवा डोळ्यांच्या संपर्कात येतो, तेव्हा तेथील म्यूकस मेम्ब्रेनच्या माध्यमातून तो शरीरात प्रवेश करतो. श्वसनमार्गातून हा विषाणू शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचतो. तोंड, नाक, घसा आणि फुफ्फुसे हा हवेचा मार्ग म्हणजेच कोरोनाच्या विषाणूचा मार्ग होय. जेव्हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या निरोगी पेशींवर आक्रमण करतो. आपल्याच असंख्य प्रतिकृती हा विषाणू माणसाच्या शरीरात तयार करतो आणि हळूहळू सर्वत्र पसरत जातो. हेल्थ जनरल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तांतानुसार, जेव्हा शरीराची रोगप्रतिकार शक्ती क्षीण पडते, तेव्हा ‘साइटोकाइनिन स्टॉर्म’ येते. म्हणजेच आपले प्रतिकारतंत्र अधिक आक्रमक बनते आणि पांढर्या पेशींची अधिक प्रमाणात निर्मिती करते. अशा अतिरिक्त पेशी नुकसानग्रस्त ऊतींची दुरुस्ती करण्याऐवजी निरोगी ऊतींवरही हल्ला चढवितात. त्यामुळे सेप्सिस, मल्टिपल ऑर्गन फेलिअर आणि अंतिमतः मृत्यू ओढवतो. तसे पाहायला गेल्यास कोरोनाच्या विषाणूंचा हल्ला फुफ्फुसांवर होतो. परंतु गंभीर रुग्णांच्या बाबतीत हा संसर्ग संपूर्ण शरीरात पसरतो. त्यामुळे आधीपासूनच ज्यांना काही आरोग्यविषयक तक्रारी आहेत, त्यांनी विषाणूपासून स्वतःला दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातल्या त्यात ज्या प्रमुख चार आरोग्य समस्या असणार्यांवर विषाणूचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो, त्यासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे.

मूत्रपिंडाचे विकार : कोरोनाचा विषाणू मूत्रपिंडावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे परिणाम करतो. मूत्रपिंडाच्या विकाराने आधीपासूनच जे ग्रस्त आहेत, त्यांना कोरोनाची लागण झाल्यास प्रकृती गंभीर बनू शकते, एवढेच नव्हे तर मूत्रपिंडे निकामी होण्याचा धोका वाढतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या (आयएसएन) नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोविड-19 च्या संक्रमणाने ज्यांच्या मूत्रपिंडावर परिणाम होतो, अशा रुग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. मूत्रपिंडाच्या समस्यांमध्ये अ‍ॅक्यूट किडनी इन्ज्युरी (एकेआय) आणि किडनी फेलिअर हे प्रमुख आजार आहेत. अमेरिकन जर्नल ऑफ किडनी डिसीजमध्ये प्रकाशित एका अध्ययन वृत्तांतानुसार, अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आलेल्या गंभीररीत्या प्रभावित रुग्णांमधील 27 टक्के रुग्णांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळून आले आहे. अशा रुग्णांनी पचण्यास हलके अन्न घ्यावे. मीठ खूपच कमी प्रमाणात घ्यावे. दारू आणि धूम्रपानापासून दूर राहावे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होत असल्यामुळे वेळच्या वेळी औषधे घ्यावीत. नियमित डायलिसीस करणार्या रुग्णांनी संसर्गाच्या भीतीमुळे डायलिसिस टाळू नये. एकदा जरी डायलिसिस टाळले तरी फुफ्फुसे आणि हृदयात द्रवपदार्थ जमा होण्यास सुरुवात होते आणि हे अत्यंत घातक ठरते. संसर्गामुळे रुग्णालयात जाण्यास भीती वाटत असेल तर पेरिटोनियल डायलिसिसचा (पीडी) पर्याय निवडावा. घरच्या घरी सुविधाजनक पद्धतीने डायलिसिस करण्याचा हा मार्ग आहे. हा मार्ग रुग्णांना गर्दीपासून दूर ठेवतो आणि संसर्गाचा धोकाही कमी करतो. याबाबतीत डॉक्टरांशी विचारविनिमय करावा.

श्वसनसंस्थेच्या तक्रारी : कोविड-19 हा श्वसनसंस्थेशी निगडित आजार आहे. या विषाणूंचा प्रभाव सर्वप्रथम फुफ्फुसांवर होतो. संसर्ग वाढल्यास फुफ्फुसे सुजतात. त्यात पाणी होते आणि श्वास घेणे अवघड बनते. जेव्हा फुफ्फुसांची सामान्य कार्यप्रणाली बिघडते तेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइडची देवाणघेवाण फुफ्फुसे करू शकत नाहीत. त्यातूनच गंभीर न्यूमोनिया किंवा अ‍ॅक्यूट रेस्परेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) उद्भवतो. त्यामुळे ज्यांना अस्थमा, ब्राँकायटिस किंवा श्वसनसंस्थेचा अन्य आजार आहे किंवा हंगामी एन्फ्लुएन्जामुळे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे, त्यांना संसर्गाचा धोका खूपच जास्त आहे. अशा व्यक्तींनी धूम्रपान, वायू प्रदूषण, रसायनांशी संपर्क, धूळ आदींपासून दूर राहावे. श्वसनयंत्राच्या खालील भागात वारंवार होणारा संसर्ग फुफ्फुसांची स्थिती कमकुवत बनवतो. त्यामुळे या संसर्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वच्छ वातावरणात राहावे. व्यक्तिगत स्वच्छता चांगली राखावी. कोमट पाण्याने स्नान करावे. दिवसातून दोनदा ब्रश करावा. थोड्या-थोड्या वेळाने हात साबणाने स्वच्छ धुवावेत. फळे आणि भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा जेवण करण्यापूर्वी हातांची चांगली स्वच्छता करावी आणि सर्वच बाबतीत स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी.

मधुमेह : मधुमेहाचा त्रास असणार्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती आणि सुरक्षा यंत्रणा कमकुवत होते. रक्तवाहिन्या कमकुवत होऊन रक्तप्रवाहावर परिणाम झाल्यास संसर्गाची शक्यता अधिकच वाढते. ब्रिटिश सोसायटी फॉर इम्युनोलॉजी या संस्थेच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींना मधुमेह असतो, त्यांना संसर्गाचा धोका तर अधिक असतोच; शिवाय आजारातून बरे होण्यास त्यांना अधिक कालावधी लागतो. मधुमेहग्रस्त रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारणे अत्यंत गरजेचे असते. शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राखणारा आहार घ्यावा आणि रात्री पूर्ण झोप घ्यावी. दररोज कमीत कमी तीस मिनिटे चालावे किंवा हलकाफुलका व्यायाम करावा. जेव्हा रक्तात साखरेचा स्तर वाढतो तेव्हा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशा वेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखावे. जर घरात कुणाला सर्दी किंवा खोकला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहग्रस्त रुग्ण ‘फ्लू शॉट्स’ घेऊ शकतात. आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहण्यासाठी सामान्य संसर्गाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हृदयरोग : कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरात ट्रोपोनिन नावाच्या प्रथिनाचा स्तर बराच वाढतो. हा हृदयाच्या स्नायूंना इजा करू शकतो. त्यामुळे हृदयाची गती तीव्र होते. जामा कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित अभ्यास अहवालानुसार, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता इतर रुग्णांच्या तुलनेत दुप्पट असते. अशा व्यक्तींनी संतुलित आणि पोषक आहार घ्यावा. आहारात फळे, भाजीपाला आणि अन्य पोषक घटकांचा समावेश करावा. क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात घ्यावे. ते केवळ आंबट फळांमध्येच नव्हे तर पालक, कोबी यांसारख्या भाज्यांमध्येही भरपूर प्रमाणात असते. अशा भाज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. वारंवार पाणी प्यावे. दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी जरूर प्यावे. त्यानंतर हर्बल चहा प्यावा. हृदय आणि रक्ताभिसरण संस्था व्यवस्थित कार्यरत राहणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी अत्यावश्यक असते. हृदयरुग्णांनी औषधे नियमित स्वरूपात घ्यावीत. डॉक्टरांकडे जाणे शक्य नसल्यास व्हिडिओ कॉल करून वैद्यकीय सल्ला घ्यावा. सध्याचा काळ कठीण असल्यामुळे आवश्यक औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात घरात करावा. धूम्रपान आणि मद्यपान अजिबात करू नये. स्टेरॉइड आणि वेदनाशामक औषधे बिलकूल घेऊ नयेत.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजिद खान यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणही करवून घेतले होते. परंतु जेव्हा शरीरातील एक अवयव व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम इतर अवयवांच्या कार्यावरही पडतो. अशा व्यक्तींचे शरीर संसर्गासाठी संवेदनशील असते. कोविड-19 च्या संसर्गकाळात वाजिद खान यांचे संवेदनशील शरीर कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले. मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आणि कोविड-19 यामुळे त्यांच्या हृदयावरील दबाव वाढत गेला आणि अखेर हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी ते अवघ्या 47 वर्षांचे होते. तात्पर्य, कोणतेही जुनाट आजार असल्यास कोविड-19 चा धोका अधिक असतो आणि असे रुग्ण दगावण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे अन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांनी कोरोनाच्या प्रसारकाळात स्वतःची अधिक काळजी घेणे गरजेचे असून, संसर्ग टाळण्यासाठी इतरांपेक्षा अधिक काटेकोरपणे नियम पाळणे आवश्यक आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या