नाशिक | प्रतिनिधी
मालेगावमध्ये आज पहाटेच्या मूत्यू झालेल्या कोरोना संशयिताचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच इतर चौघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एकाच दिवशी मालेगावात पाच रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आज सायंकाळी आलेल्या अहवालात मालेगावचे पाच रुग्ण पाॅझिटिव्ह मिळून आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ७ झाली आहे.
आज पहाटेला मालेगावात एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते. हे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. यामध्ये मृत्यू झालेल्या रूग्णासह इतर चौघांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
मृत्यू झालेला रुग्ण दोन महिन्यापूर्वी सौदी अरेबियामध्ये यात्रेसाठी जाऊन आल्याचे समजते. तर इतर पाॅझिटिव्ह रुग्णांचे कनेक्शन अद्याप समजू शकले नाही.
मालेगावातील कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या सर्व रुग्णांवर मालेगावच्या उप जिल्हा रुग्णालयातील विशेष कोरोना कक्षामध्ये उपचार केले जात आहेत.
जिल्ह्यासह सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात असतानाच अचानक धक्कादायक अहवाल मालेगावातून समोर आल्यामुळे प्रशासन हादरले आहे.
तबलिगी जमातीचे अनेकजण नाशिकमध्ये आले आहेत. त्यांच्याशी या पाॅझिटिव्ह रुग्णांचे काही कनेक्शन आहे का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.