लंडन – अवघ्या 50 मिनिटांत कोरोनाच्या चाचणीचा निष्कर्ष देणारे तपासणी यंत्र ब्रिटनमध्ये विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे यंत्र स्मार्टफोनवर आधारित आहे. सध्याच्या चाचण्यांद्वारे घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी घेतल्यानंतर निष्कर्ष यायला किमान 24 ते 48 तास लागतात. हे नमुने प्रयोगशाळांत पाठवावे लागतात, त्यामुळे निष्कर्ष येण्यासाठी वेळ लागतो. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ अँग्लियामधील (यूईए) संशोधकांनी विकसित केलेल्या या यंत्राद्वारे राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एनएचएस) कर्मचार्यांवर दोन आठवड्यांत चाचण्या सुरू होतील.
संशयित रुग्ण असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचार्यांची तातडीने तपासणी करणे, हे या यंत्राचे उद्दिष्ट आहे. या कर्मचार्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्याच्या हेतूने यंत्र विकसित करण्यात आले आहे. घरी असलेल्यांकडून विषाणूचा फैलाव टाळणे, हाही हेतू आहे.
एनएचएसमधील कर्मचार्यांची चाचणी लवकरात लवकर करून घेणे, ही यामागील मुख्य कल्पना आहे. ते निरोगी असतील, तर कार्यरत राहतील, अन्यथा त्यांना घरी पाठवून कोरोनाचा प्रसार रोखता येईल, असे यूईएमधील नॉर्विक मेडिकल स्कूलमधील प्रमुख संशोधक जस्टिन ओग्रँडी यांनी सांगितले. गेला महिनाभर हे यंत्र विकसित करण्यासाठी काम सुरू होते. दोन आठवड्यांत हे यंत्र देशातील प्रमुख हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होईल, असा विश्वासही ओग्रँडी यांनी व्यक्त केला.
असेे काम करते यंत्र
– हे यंत्र रेणूआधारित चाचणी करते
– एका वेळी 16 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता
– प्रयोगशाळेतील मशिनला जोडल्यास एका वेळी 384 चाचण्या करण्याची क्षमता