अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सर्व नगरकरांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेसारखी नगर महापालिकेने 15 लाख लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर करावे. कोविड उपाययोजनासाठी आलेला निधी व नगरसेवक निधीचाही त्यासाठी वापर करावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नगर शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मध्यंतरीच्या काळात मृत्युदरही वाढला. राज्य शासनाकडून पुरवठा होणारी लस ही अत्यंत कमी आहे. शहराची लोकसंख्या पाहता लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. लस कमी आणि लसीसाठीची रांग मोठी असे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. त्यातून आरोग्य विभागातील कर्मचार्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचेही दिसून येते.
आज लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस हाच त्यावर एकमेव उपाय आहे. महापालिकेने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 15 लाख लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर मागवावे. त्यासाठी लागणारा निधी कोविड उपाययोजनेच्या निधीतून वापरावा. राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील नगरसेवकांचा स्वेच्छा, वार्ड विकास निधीही त्यासाठी वापरता येणे शक्य आहे. नगर शहराची लोकसंख्या पाहता ही बाब अत्यंत आवश्यक आहे, असे आ. जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आमदार निधीही देणार
आयुक्तांनी ग्लोबल टेंडर करून लस खरेदीचा प्रस्ताव मान्य केला तर त्यासाठी कोविडसाठी आलेला एक कोटी रुपयांचा आमदार निधीही त्यासाठी देण्यात येईल. नगरसेवकांचा निधीही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यातून 15 लाख लस डोस खरेदी करणे शक्य आहे. या डोसमधून नगरकरांचे दोन डोस सहज होईल, असा प्रस्ताव आमदार जगताप यांनी महापालिकेला दिला आहे.