सार्वमत
नवी दिल्ली – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावरील उपचारांबद्दल संशोधन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एका कृती समितीची स्थापना केली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. ही समिती आयुर्वेदिक आणि परंपारिक औषधांवर काम करून कोरोनावरील उपचार शोधण्याचं काम करेल.
आयसीएमआर संस्थेसोबतही समिती काम करेल, आम्हाला या संदर्भात आतापर्यंत 2 हजार प्रस्ताव मिळाले असून यातल्या अनेकांची वैद्यकीय वैधता पडताळून पाहण्यासाठी आम्ही ते आयसीएमआर आणि अन्य संशोधन संस्थांना पाठवणार आहे असंही नाईक म्हणाले. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर अद्याप तरी कोणत्याही देशाला लस तयार करता आलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून कोरोनावर उपचार शोधण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे. आयुर्वेद आणि परंपारिक औषधांच्या मदतीनं कोरोनाला नियंत्रणात ठेवणारे उपचार शोधण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोनावरील उपचार शोधून काढण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदही (आयसीएमआर) काम करत आहे.
कोरोना विषाणूची लस शोधण्यात आतापर्यंत तरी जगातील वैज्ञानिकांना अपयश आलं असलं तरी या लसीचं नेमकं लक्ष्य काय असेल ते अमेरिकी वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे. कोरोनाच्या उपचारात हे संशोधन अतिशय मोलाचं ठरू शकतं. यामुळे शरीरातील कोरोना विषाणूवर थेट हल्ला करता येणं शक्य होईल. अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. सध्या जगभरात कोरोनाची लस तयार करण्याच्या दृष्टीनं संशोधन सुरू असल्याचेही नाईक यांनी सांगितले.