नवी दिल्ली – कोरोना प्रभावित राज्यांमध्ये केंद्र सरकारने विशेष पथके पाठवली आहेत. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासह प्रशासनाला योग्य त्या सूचना पथकाकडून देण्यात येतील. महाराष्ट्रासह बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक तसेच इतर राज्यांमध्ये पथके पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून दिली.
देशात गेल्या चोवीस तासांमध्ये 549 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या त्यामुळे गुरूवारी 5 हजार 734 च्या घरात पोहचली. बुधवारी 773 नवे रूग्ण आढळले होते. तर, 32 जणांचा मृत्यू झाला होता. संसर्गग्रस्तांच्या संख्येसह मृत्यूच्या प्रमाणातही सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत 166 तर, बुधवारपासून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला. 473 रूग्णांनी संसर्गावर मात केल्याचेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
पीपीई, मास्क, व्हेंटिलेटरचा पुरवठा सुरु
राज्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरण पीपीई, मास्क तसेच व्हेंटिलेटरचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. 20 कंपन्यांमध्ये पीपीई तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1.7 कोटी पीपीई चा पुरवठा करण्यात आला असून 49 हजार व्हेंटिलेटर चा देण्यात आला आहे. यासोबतच हैद्राबाद तसेच दिल्लीतील सीएसआयआर च्या प्रयोगशाळांना तैनात करण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
रेल्वे मंत्रालयाचे विशेष सहकार्य
कोरोना विरूद्धच्या लढ्यात राज्यांसह रेल्वे मंत्रालयाचे विशेष सहकार्य मिळत आहे. रेल्वेने 2 हजार 500 हून अधिक डॉक्टर तसेच 35 हजार पॅरामेडिकल कर्मचार्यांना तैनात केले आहे. रेल्वेचे 45 उपविभागीय, 56 विभागीय तसेच 8 प्रोडक्शन युनिट रूग्णालये, 16 झोनल रूग्णालये कोरोना संबंधीच्या महत्वपूर्ण सुविधांसाठी तैनात करण्यात आले आहे. रेल्वे विभागाकडून 80 हजार खाट संख्या असलेले विलगीकरण कक्ष बनवण्यासाठी 5 हजार डब्यांचा वापर केला जात आहे. 3 हजार 250 खाट क्षमतेचे विलगीकरण कक्ष आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत. अडॉप्ट ए फॅमिली अभियानाअंतर्गत हरियाणातील करनाल येथील 13 हजार गरजू परिवारांना 64 लाखांची मदत देण्यात आल्याचेही अग्रवाल म्हणाले.