अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील विळदच्या पाण्याची टाकी येथील रुग्णाचा करोना चाचणी अहवाल रविवारी (12 जुलै) सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर आज सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराला कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.
करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कंटेनमेंट झोन म्हणजे काय?
ज्या घरामध्ये करोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, त्या घराला एपिसेंटर (किंवा मध्यवर्ती) मानून त्याच्या आसपासचा साधारणत: 500 मीटरचा परिसरही सील केला जातो. यालाच कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हटलं जातं. Contain करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला आवर किंवा आळा घालणं.
दाटीवाटीच्या शहरी भागात अधिकाऱ्यांनी हा परिसर निश्चित करावा, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आपल्या वेबसाईटवर सांगितलं आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहसचिव लव अग्रवाल यांनी यापूर्वी सांगितले आहे, “करोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करणे. ते कोणत्या परिसरात फिरले याबाबत चौकशी करणं. करोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील आत आणि बाहेर येण्याचे रस्ते पूर्णत सील करणे. या सर्वांचा अभ्यास करून कंटेनमेंट झोन बनवण्यात आला पाहिजे.”
दरम्यान शहरी भागात करोनाचा रुग्ण आढळून आला आहे, अशी इमारत, मोहल्ला, चाळ, पोलीस स्टेशनची हद्द किंवा महापालिका वॉर्ड सील केला जाऊ शकतो.
ग्रामीण भागात गाव, आसपासची काही गावं, ग्रामपंचायत, एकापेक्षा जास्त पोलीस स्टेशनचा समूह, असं क्षेत्र गरजेनुसार सील केलं जाऊ शकतं.