मुंबई | प्रतिनिधी Mumbai
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा अॅडव्हान्स देऊन भाजपने पळवून नेल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी नागपूर येथे बोलताना केला. या सर्व विकल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींवर व्हीप जारी करून त्यांना अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया काँग्रेस पक्ष तातडीने सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करणार आहेत. विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील काँग्रेसचे २३ नगरसेवक संपर्कात नाहीत. हे नगरसेवक भाजपच्या एका आमदारासोबत असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी आज भाजपवर जोरदार टीका केली. सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे. ठेकेदारच भाजपचे आमदार झाल्याने पैशाची मस्ती कशी येते, हे चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजारावरून दिसते. काँग्रेसच्या नगरसेवकांना ५ लाख रुपये देऊन उचलण्यात आले असून काँग्रेस जितके देईल त्याच्या डबल देऊ असे आमिष भाजप कडून दाखवले जात आहे.याबद्दलची सर्व माहिती आणि पुरावे आहेत. वेळ आल्यावर सगळे पुरावे आपण मांडू, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यात भाजपची सत्ता नसती तर एकाही नगरसेवकाची पक्षांतर करण्याची हिंमत झाली नसती, असेही ते म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून उमेदवारांची नावे पुढे आली असून पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल,अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.




