पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
जांभळी गावच्या शिवारात कपाशीच्या पिकामध्ये गांजाची लागवड (Cannabis) केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा नगर (LCB Police) आणि पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 11 किलो 600 ग्रॅम वजनाची गांजाची पाच लहान-मोठी झाडे जप्त (Seized) केली. या कारवाईत किशोर बन्सी जायभाये (वय 39, रा. येळी, ता. पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले.
जप्त गांजाची किंमत 2 लाख 32 हजार रुपये आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलिस अंमलदार विकास साळवे, गणेश लोंढे, भगवान सानप, बाळासाहेब खेडकर व वंदना मोढवे यांचे पथक तयार केले होते. 23 सप्टेंबर रोजी हे पथक पाथर्डी पोलिस ठाण्याच्या (Pathardi Police Station) हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना किशोर जायभाये याने जांभळी शिवारातील शेतात कपाशीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. याबाबत पाथर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक आणि पाथर्डी पोलिसांचे पथक पंचांसह संबंधित शेतात दाखल झाले. पोलिसांनी किशोर जायभाये याच्या उपस्थितीत पंचांसमक्ष शेताची पाहणी केली असता कपाशीच्या पिकामध्ये (Cotton Crop) गांजाची पाच लहान-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी 11 किलो 600 ग्रॅम वजनाची ही गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर जायभाये याच्या गुन्हेगारी अभिलेखाची तपासणी केली असता तो पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो सराईत गुन्हेगार असून दि. 30 जानेवारी 2024 पासून दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर व आष्टी तालुक्यांतून त्याला हद्दपार केले होते.




