नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa
नेवासाचा कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत समावेश झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तसेच तालुक्यात कापूस प्रक्रिया उद्योगांना निश्चितच चालना मिळेल अशी प्रतिक्रिया राज्याचे मृद व जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी व्यक्त केली.
ना.गडाख पूढे म्हणाले, मराठवाडा व विदर्भात कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र, नगरमधील नेवासे तालुक्यातही गेल्या काही वर्षात ऊसापाठोपाठ कापूस पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. राज्य शासनाने कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत नेवासाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील शासननिर्णय अवर सचिव विशाल मदने यांनी सोमवारी जारी केला आहे. त्यामुळे नेवासे तालु्क्यात कापूस पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यातून तरूणांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ नुसार सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांकरिता शासकीय भागभांडवल योजना राबविण्याकरिता राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील १८ जिल्ह्यातील ११५ तालुके कापूस उत्पादक तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ३६ तालुके, विदर्भातील ५५ तालुके, नाशिक विभागातील २४ तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा काही नवीन तालुक्याचा समावेश केला आहे. आता राज्यात एकूण १२२ एवढी तालुक्याची संख्या झाली आहे. यामध्ये नव्याने नेवासेचा समावेश केला आहे.
तालुक्यात उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के पेक्षा कमी कापूस सुतगिरणीकरिता वापरल्या जातो त्याच तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.
सर्वसाधारणपणे २५ हजार २०० चात्या पूर्ण क्षमतेने सुरी असणाऱ्या सहकारी सूतगिरणीस वर्षाला किमान २८ हजार ८०० गाठी (एक गाठ म्हणजे १७० किलो) म्हणजेच ४ हजार ८९६ टन एवढा कापूस आवश्यक असतो. नव्याने सूतगिरणी सुरू होणाऱ्या ठिकाणी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी किमान ९ हजार ६०० टन कापसाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यानुसार एखाद्या तालुक्यात सूतगिरणी स्थापन करण्यासाठी ४ हजार ८०० टन कापूस उत्पादन असणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करून यापुढे भविष्यात स्थापन होणारी सहकारी सूतगिरणी सक्षमपणे चालविण्यासाठी वार्षिक ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन होत असलेले तालुके घोषित करण्यात आले आहेत.
नेवासा तालुक्यात कापसाचे जवळपास २० हजारहून अधिक हेक्टरवर लागवड होते. चालू वर्षीही तालुक्यात २० हजार ६३४ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मागील दोन वर्षातील सरासरी कापसाचे उत्पादन ९६०० टनापेक्षा जास्त असल्याने मोठी उलाढाल तालुक्यात झाली आहे. मात्र, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने कमी दर मिळत आहे. तालुक्यात प्रक्रिया उद्योग असेल तर किमान पाच ते दहा टक्के अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने नेवासे तालुक्याचा कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीत समावेश केल्याने निश्चितच तालुक्यात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा राहण्यास मदत होणार आहे.