Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगजलसंकटामुळे देश संघर्षाच्या उंबरठ्यावर

जलसंकटामुळे देश संघर्षाच्या उंबरठ्यावर

संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी पृथ्वीवरील पाण्याचे संकट गहिरे होत राहिल्यास पाणी मिळवण्यासाठी वेगवेगळे देश एकमेकांशी युद्ध करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. भारतात गेल्या काही दशकांपासून विविध राज्यांमध्ये पाणीवाटपावरून तीव्र मतभेद आहेत.

पाण्याच्या प्रश्नावर ‘ग्लोबल कमिशन ऑन द इकॉनॉमिक्स ऑफ वॉटर’ (जीसीईडब्ल्यू) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एक धक्कादायक वास्तव जगासमोर ठेवण्यात आले आहे. या दशकाच्या अखेरीस पाण्याची मागणी चाळीस टक्क्यांनी वाढेल. त्याचवेळी टंचाई आणखी वाढेल. सतत वाढणार्‍या उष्णतेमुळे पुढील दोन दशकांमध्ये अन्न उत्पादनात लक्षणीय घट होईल. या अहवालानुसार, भारताला अन्न पुरवठ्यातही सोळा टक्क्यांहून अधिक तुटवडा जाणवेल. अन्न असुरक्षित लोकसंख्या पन्नास टक्क्यांहून अधिक वाढेल. अहवालानुसार, 2010 च्या तुलनेत 2050 पर्यंत भारतातील पाण्याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. वास्तविकता अशी आहे की जगातील जवळपास सर्वच देशांसाठी आता पाण्याचे संकट गंभीर बनले आहे.

नद्या ही भारताची जीवनरेखा मानली गेली आहे; परंतु गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यासारख्या प्रचंड नद्यांमधील पाणी कमी होत जाणार असून, 2050 पर्यंत पाण्याची उपलब्धता गरजेच्या एक तृतीयांशपेक्षा कमी असेल, असे न्यूयॉर्कमधील एका परिषदेत सांगण्यात आले. सुमारे 2500 किलोमीटर लांबीची गंगा ही भारतातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. तिच्यावर अनेक राज्यातील करोडो लोक अवलंबून आहेत. हिमालयात 9,575 हिमनद्या आहेत. एकट्या उत्तराखंडमध्ये 968 हिमनद्या आहेत; मात्र हवामानातील असाधारण बदलामुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. त्यामुळे देशात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. एका अंदाजानुसार, सध्या जगात सुमारे दोन अब्ज लोक आहेत. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही आणि यामुळे लाखो लोक आजारी पडून अकाली मृत्यूला बळी पडतात.

- Advertisement -

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी फक्त तीन टक्के पाणी स्वच्छ आहे. त्यापैकी सुमारे दोन टक्के पाणी बर्फाच्या रूपात पर्वतांवर आहे. उर्वरित एक टक्का पाणी पिण्यासाठी, सिंचन, शेती आणि उद्योगांसाठी वापरले जाते. उर्वरित पाणी खारट असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे उपयुक्त किंवा जीवनदायी नाही. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या या एक टक्का पाण्यापैकी सुमारे 95 टक्के पाणी पृथ्वीच्या खालच्या थरात भूगर्भातील पाण्याच्या रूपात आणि उर्वरित पृथ्वीवरील तलाव, नद्यांमधून उपलब्ध आहे.

आपल्या पाण्याच्या बहुतांश गरजा केवळ भूगर्भातील पाण्यापासूनच भागवल्या जातात; परंतु त्याचे प्रमाण लोकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे नाही. सध्या जगभरातील सुमारे तीन अब्ज लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पाण्याच्या मुद्यावरून मतभेद आहेत. उत्तर आफ्रिकेतील काही देशांमध्ये पाण्यावरून संघर्ष झाला आहे. पाण्यावरून इस्रायल आणि जॉर्डन, इजिप्त आणि इथिओपिया यासारख्या इतर काही देशांमध्येही जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.

भारतात गेल्या काही दशकांपासून विविध राज्यांमध्ये पाणी वाटपावरून तीव्र मतभेद आहेत आणि सध्याही काही राज्यांमध्ये पाणीवाटपाचा प्रश्न सतत प्रलंबित राहिल्याने पाणीसंकटाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. भारतात एकेकाळी हजारो नद्या वाहत असत; पण आज या हजारो नद्यांपैकी बहुतांश आता काही काळच प्रवाही असतात. त्या कोरड्या पडल्या आहेत. पूर्वी प्रत्येक गावात आणि परिसरात विहिरी आणि तलाव असायचे. ते आता नाहीसे झाले आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वापरण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे आणि भूगर्भातील पाण्याची पातळीही सातत्याने कमी होत असेल तर पाण्याची गरज कशी भागणार? पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक होत नसल्याने या पाण्याचा वापरही योग्य प्रकारे होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर पावसाचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. तो वाचवणे अत्यंत आवश्यक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. वाहून जाणार्‍या पाण्याचे संवर्धन करून पाण्याची कमतरता सहज भरून काढता येईल आणि अशा प्रकारे जलसंकटाचा बर्‍याच अंशी मुकाबला करता येईल.

नैसर्गिक संसाधने दूषित होण्यापासून संरक्षण करणे, पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आणि पाण्याचा गैरवापर टाळणे अत्यंत आवश्यक आहे. ‘नेचर सस्टेनेबिलिटी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष दर्शवतात की शहरांमधील वाढत्या जलसंकटाला पर्यावरणीय घटकांपेक्षा सामाजिक असमानता अधिक जबाबदार आहे. हा अभ्यास दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरावर आधारित असला तरी संशोधकांनी बंगळूर, चेन्नई, जकार्ता, सिडनी, मापुटो, हरारे, साओ पाउलो, लंडन, मियामी, बार्सिलोना, बीजिंग या शहरांचाही अभ्यास केला आहे. हवामान बदल आणि लोकसंख्या वाढ याचा अर्थ मोठ्या शहरांमध्ये पाणी अधिक महाग स्त्रोत बनत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये दुष्काळ आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे जगातील 80 हून अधिक मोठी शहरे जलसंकटाने त्रस्त आहेत. भविष्यात हे संकट आणखी वाढेल, असा अंदाज आहे. शहरांमध्ये पाणीवाटपाचे योग्य मार्ग विकसित न केल्यास सर्वांनाच परिणाम भोगावे लागतील.

पाण्याचा अयोग्य वापर आणि हवामान संकट या दोन्ही गोष्टी या वाढत्या टंचाईला कारणीभूत आहेत. तापमानवाढीसह पर्जन्यमानावर परिणाम होत आहे. त्यामुळे जलसंकटाची समस्या आणखी वाढत आहे. येत्या काही वर्षांमध्ये शहरांवरील पाण्याचे संकट अधिक गंभीर स्वरूप धारण करेल, असा अंदाज आहे. आज शहरांमध्ये राहणारे सुमारे शंभर कोटी लोक म्हणजे शहरी लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. 2050 पर्यंत हा आकडा 237.3 कोटींपर्यंत वाढण्याची भीती आहे. संशोधनानुसार याचा सर्वाधिक फटका भारतातील शहरी लोकसंख्येला बसणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या नवीन ‘वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट’नुसार 2050 पर्यंत शहरांमधील पाण्याची मागणी 80 टक्क्यांनी वाढेल. आपण आपल्या जलस्रोतांचे अतिशोषण करत आहोत. ही समस्या टाळण्यासाठी परस्पर सहकार्य आणि भागीदारी आवश्यक आहे. पाणी हा एक अमूल्य स्त्रोत आहे. त्याचा अपव्यय आपल्यापुढील संकटात भर घालणार आहे, हे लक्षात ठेवावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या