Friday, May 3, 2024
Homeनगरलसीकरण करून घ्या, अन्यथा...

लसीकरण करून घ्या, अन्यथा…

अस्तगांव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील ८० टक्क्याच्या वर ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. उर्वरीत ग्रामस्थ मात्र लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. या हालगर्जीपणामुळे रुग्ण वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गाव लॉकडाऊन केले आहे.

- Advertisement -

लसीकरणासाठी हयगय करणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीने लस नाही तर रेशन व ग्रामपंचायतीचे विविध दाखले न देण्याचे धोरण जाहीर केले आहे, अशी माहिती सरपंच नवनाथ नळे यांनी दिली. पिंप्रीनिर्मळ पाठोपाठ अस्तगावनेही हा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात सुरु असलेल्या मिशन कवच कुंडल अंतर्गत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी लसीकरणाचा सप्ताह सुरु आहे. अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात यासाठी दररोज लसीकरण वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. येत्या १५ तारखेपर्यत नियमीत सुरू असलेल्या या लसीकरण कॅम्पमध्ये लसीकरण करून घेण्याचे अवाहन सरपंच नवनाथ नळे यांनी केले आहे.

अस्तगांव गावात करोना रूग्णसंख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गाव दहा दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तसेच लसीकरणावरही भर दिला आहे. गावची लोकसंख्या सोळा हाजारांच्या आसपास आहे. नागरिकांच्या लसीकरणासाठी शासन पातळीवर नियमीत लसीकरण कॅम्पचे आयोजन केले आहे. मात्र नागरिकांकडुन या लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. गावाला उपलब्ध झालेल्या लसी काही बेजबाबदार नागरिकांमुळे शिल्लक राहत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेतला आहे.

गावातील नागरिकांची सुरक्षितता व हीत लक्षात घेता ज्या नागरिकांकडून लसीकरणाला टाळटाळ होत आहे, अशा नागरिकांचे रेशनवरील रेशन व ग्रामपंचायतीचे विविध दाखले बंद करण्याचे धोरण ग्रामपंचायतीने घेतले आहे. तसेच गावातील सर्व दुकानदार, त्यांचे कर्मचारी तसेच भाजीपाला विक्रेते यांच्या लसीकरणाची पडताळणी ग्रामपंचायत पातळीवर होणार असल्याने उर्वरीत ग्रामस्थांसह व्यावसायीकांनी सुरू असलेल्या लसीकरण कॅम्पमध्ये लसीकरण करून घेण्याचे अवाहन सरपंच नवनाथ नळे केले आहे.

अस्तगाव मध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण असल्याने गाव लॉकडाउन आहे. त्यामुळे दुकानदार तसेच ग्रामस्थांचेही हाल होत आहेत. गाव करोना मुक्त होणे गरजेचे असल्याने सर्वांनी योग्य काळजी घ्यावी, गाव पुन्हा लॉकडाऊन होणार नाही यासाठी करोनाच्या नियमाचे पालन करा, लसीरकण करुन घ्या, जे जाणिवपूर्वक लसीकरण करणार नाहीत, त्यांना पुढे अडचणी येणार आहेत. १५ तारखे पर्यंत सर्वांनी लसीकरण करून घ्यावे!

– नवनाथ नळे, सरपंच अस्तगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या