अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून आज 1 सप्टेंबरपासून पशुगणना करण्यात येणार आहे. यावर्षी होणारी पशुगणना 21 वी असून ती एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. प्रथमच डिजीटल पध्दतीने मोबाईल अॅपच्या मदतीने होणारी ही पशुगणना पुढील चार महिने चालणार आहे. या पशूगणनेत जिल्ह्यातील गायी, म्हशी, कुत्री (पाळीव आणि भटके स्वतंत्रपणे), शेळ्या, मेंढ्या, गाढवे, उंट, घोडे आणि डुकरांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. देशातील लोकसंख्या ज्या पद्धतीने मोजली जाते, त्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यावर्षी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही पशुगणना होणार असून ती पूर्णपणे पेपरलेस राहणार आहे. पशुगणनेसाठी यंदा पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर केला जाणार आहे. 2019 मध्ये झालेल्या 20 व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दिले होते, तर त्यापूर्वीची पशुगणना नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीत अनेक रकाने होते. ते भरताना बराच वेळ जात असे. मात्र, यावर्षी होणार्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी एका विशिष्ट अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरली जाणार आहे.
यंदाची पशुगणना ही जनावरांच्या जाती आणि प्रजातीनिहाय करण्यात येणार आहे. यासाठी 583 प्रगणक आणि 78 पशुपर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ही पशुगणना नगर पालिका, परिषद आणि महानगर पालिका अशा शहरी भागासह ग्रामपंचायत हद्दीत म्हणजे ग्रामीण भागात स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. चार महिने चालणार्या पशुगणनेसाठी सुपवाईजरांना ऑनलाईन युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ते नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना युजर आयडी देणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्यावतीने दुधाला अनुदान देण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील पूशधनात वाढ झाल्याचे पहावसाय मिळाले आहे. यामुळे यंदाच्या पशूजनगणेत जिल्ह्यात दुभात्या जनावरांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.
पहिल्यांदाच पाळीव श्वानाची मोजणी
यंदाच्या पशूजनगणेत पहिल्यांदा पाळीव कुत्र्यांची गणना होणार आहे. यापूर्व झालेल्या गणनेत अंदाजे भटकी कुत्री मोजण्यात येत होती. यंदा मात्र, पाळीव कुत्र्यांची देखील मोजणी होणार आहे. हे यंदाच्या पशुगणनेचे वैशिष्ठ ठरणार आहे.
गावनिहाय मान्यता
यापूर्वी झालेल्या गणनेत गाव पातळीवर असणारे प्रगणक अथवा सुपरवाईजर पशुगणनेला अंतिम करत. यंदा मात्र गावनिहाय होणारी पशुगणना तपासून संबंधित जिल्हा पशूसवंर्धन विभागाच्या उपायुक्तांना पडताळणी करून मान्यता देण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.
महिलाही मदतीला
यंदा होणार्या 21 व्या पशुगणनेत जिल्ह्यात 583 प्रगणक यांची नियुक्त करण्यात आली असून यात पशूसंवर्धन विषयक ज्ञान असणार्या व्यक्तींसोबत पशू सखी (महिलांची) निवड करण्यात आली आहे. यासह 78 पर्यवेक्षक यांचा समावेश असून यातील बहुतांशी एलडीओ (पशूधन विकास अधिकारी) यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रगणकांनी पशुगणनेची माहिती भरताना स्वतःचा मोबाईल वापरावयाचा असून, त्यासाठी त्यांना मानधन दिले जाणार आहे.
वायव्य दिशेपासून सुरूवात
जिल्ह्यात आजपासून सुरू होणारी पशुजणगनाही प्रत्येक भागाच्या वायव्य दिशेपासून सुरू होणार असून त्यानंतर घडाळ्याच्या काट्यानूसार उर्वरित दिशेला पूर्ण करण्यात येणार आहे. पशुजनगणेच्या राष्ट्रीय मानाकंनानूसारही जनगणा होणार आहे. 2011 च्या माणसांच्या जनगणनेच्या कुटूंब संख्येच्या यादीनूसार ही पशुगणना करण्यात येणार आहे.
वस्तुनिष्ठ माहिती द्या
पशुधनाची माहिती घेण्यासाठी प्रगणक येतील. त्यावेळी नागरिकांनी त्यांना वस्तुनिष्ठ व खरी माहिती द्यावी. दिलेल्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नये. सर्वांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे. पशूजनगणेच्या आधारे शासनाला विविध उपयुक्त योजना राबवण्यास मदत होणार आहे.
– डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
2019 ची आकडेवारी
गायवर्ग 13 लाख 78 हजार 803
म्हशी 2 लाख 22 हजार 600
मेंढ्या 2 लाख 32 हजार
शेळ्या 10 लाख 94 हजार
गाढवे 3 हजार 200 (अंदाजे)
भटकी कुत्रे 19 हजार (अंदाजे)