उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे गायांच्या गोठ्यात वीज प्रवाह उतरल्याने चार गाई दगावल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. धामोरी खुर्द येथील शेतकरी शिवाजी भागवत हरिश्चंद्रे हे धामोरी-वांबोरी रस्त्यावर शेतात राहत आहेत. त्यांनी घरापासून दीडशे फुटावर असलेल्या खांबावरून घरगुती वीज कनेक्शन घेतलेले आहे. शनिवार दि. 17 मे रोजी झालेल्या अवकाळीच्या वादळामुळे खांबावरून येणारे दोन वीज प्रवाह एकत्र झाल्याने त्यांच्या पत्राच्या गोठ्यात वीज प्रवाह उतरला. त्यामुळे एका गायीला विजेचा जोराचा धक्का बसल्याने ती गाय खाली कोसळली.
गाय कोसळल्याचा आवाज आल्याने हरिश्चंद्रे हे गोठ्याजवळ गेले असता त्यांना इतर गायींचा थरकाप होत असल्याचे जाणवले. अशा अवस्थेत त्यांनी पडलेल्या गाईला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून गाईपासून बाजूला झाल्याने ते वाचले. परंतु या कालावधीत गोठ्यातील चार गायी विजेच्या धक्क्याने दगावल्या.
शिवाजी हरिश्चंद्रे अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यांनी नुकतेच कर्ज काढून गायी खरेदी केल्या होत्या. या गाईच्या माध्यमातून 60 ते 70 लिटर दूध सुरू होते. त्यातून कर्जाचे हप्ते फेडून राहिलेल्या पैशात आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते. परंतु अचानक काळाने घाला घातल्यामुळे त्यांच्या चार गायी दगावल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.
याबाबत महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क केला असता त्यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचे दखल घेत वरिष्ठांना कळविण्यात येईल असे सांगितले.
या गोठ्यामध्ये एकूण सहा गायी होत्या परंतु दोन गाईच्या मध्ये मोठे अंतर असल्यामुळे त्या सुदैवाने वाचल्या. अतिशय कष्टातून व्यवसाय करणार्या शिवाजी हरिश्चंद्रे या घटनेमुळे हतबल झाले आहेत. शासनाने हरिश्चंद्रे यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.