नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शिलापूर येथे उभारण्यात आलेल्या सीपीआरआय लॅबमुळे नाशिकमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला नवीन उंची प्राप्त होऊन नाशिक हे लवकरच इलेक्ट्रिक हब म्हणून विकसित होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शिलापूर येथे साकारण्यात आलेल्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्युटच्या प्रादेशिक प्रयोगशाळेचे केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार अॅड.राहुल ढिकले, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार प्रा.देवयानी फरांदे,आमदार सरोज आहिरे, सीपीआरचे महासंचालक असित सिंग, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सीपीआरआय ही केवळ एक प्रयोगशाळा नाही, तर ती विद्युत सुरक्षेची, संशोधनाची आणि उद्योगविश्वाला दिशा देणारी एक महत्वाची संस्था आहे.विद्युत उपकरणे, ट्रान्सफॉर्मर्स, केबल्स, स्विचगिअर्स यांची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार चाचणी करण्याचे केंद्र म्हणजे सीपीआरआय आहे.जगभरात विद्युत उपकरणांची मागणी प्रचंड वाढत असताना, त्यांच्या गुणवत्तेची खात्री मिळवून देणे ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आता आपल्या नाशिकनेही पेलण्यास सुरुवात केली असून नाशिकमध्ये उद्योगवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिक प्रयत्न करत आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या वेळी मंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक हे केवळ धार्मिक नगरी नाही तर औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. आगामी काळात ते इलेक्ट्रिक हब म्हणून देखील विकसित होईल. नाशिकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, सिमेन्स, किर्लोस्कर, ABB, Crompton, Schneider Electric यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादन केंद्रे स्थापन केली आहेत. त्यामुळे विद्युत उपकरण निर्मिती आणि त्याच्या गुणवत्तेची तपासणी याची मोठी गरज होती. ही गरज आजच्या या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या रूपाने पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिकलचे सुमारे साडेचारशेहून अधिक लघु आणि माध्यम उद्योग आहेत. त्यांना इलेक्ट्रिकल पॅनल्स आणि इतर वीज उपकरणांच्या निर्मितीनंतर टेस्टिंग करण्यासाठी सद्या भोपाळ व बेंगलोरला जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब स्थापन करण्याची नाशिकच्या उद्योजकांची मागणी होती. याबाबत आपण नाशिकच्या उद्योजकांना सदर लॅब स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार खासदार समीर भुजबळ यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब मंजूर करून घेतली.सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर २७ जुलै २०१३ रोजी आपण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सी.पी.आर.आय चे महानिदेशक आणि इतर वरिष्ट अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत शिलापूर येथील शंभर एकर जागा नाममात्र दराने देण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी विलास पाटील आणि सी.पी.आर.आय चे महानिदेशक यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवून आणला.
इलेक्ट्रीक टेस्टिंग लॅब प्रकल्प नाशिकमधील विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला कलाटणी देणारा असा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या उद्योजकांना मोठा फायदा मिळणार असून रोजगाराची मोठी संधी देखील मिळणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तसेच पश्चिम भारतातील कंपन्यांना जागतिक स्तरावर दर्जेदार चाचण्या मिळतील.निर्यात वाढीस चालना मिळेल. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना बळकटी मिळणार आहे.स्थानिक पातळीवर हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.
देशविदेशांतर्गत विद्युत उपकरणे वापरासाठी चाचणी परीक्षण आवश्यक असते त्याची सुविधा स्थानिक ठिकाणी होणार असल्याने नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय विद्युत बाजारपेठेच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे.नाशिकमधील लहान व मोठ्या विद्युत उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे विस्तारीकरण येथे होण्यास मदत होईल. इटली, कॅनडा, ब्राझील, इराण, हॉलंड अशा अनेक देशांच्या चाचणी सुविधादेखील सीपीआरआयप्रमाणेच असल्याने स्थानिक उद्योगांना थेट उत्पादनांचा पुरवठा या देशात करणे शक्य होणार आहे. ही लॅब नाशिकला औद्योगिकदृष्ट्या नवे उंचीवर नेईल असे त्यांनी यावेळी सांगितले.





