Sunday, January 25, 2026
Homeराजकीय"दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…"; चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावरून संजय राऊतांचा...

“दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबाबत केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गुजरात मधील सुरत येथे आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी “छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते,” असे विधान केले. या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

सुरत येथील कार्यक्रमात पाटीदार समाजाचे गौरवगान करताना सी. आर. पाटील म्हणाले की, देशाला एकत्र आणण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आणि ते पाटीदार होते. पाटीदार समाज हा अत्यंत प्रतिष्ठित असून आपल्या समाजातील किंवा गावातील कोणीही उपाशी राहू नये, याची काळजी हा समाज घेतो. याच ओघात बोलताना त्यांनी, “मला हे सांगायला आनंद होत आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे देखील पाटीदार होते,” असे विधान केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

YouTube video player

सी. आर. पाटील यांच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, “हे विधान म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे दैवत आहेत, त्यांना जातीच्या चौकटीत अडकवू नका. भाजपने यापूर्वी अनेक युगपुरुष पळवण्याचा प्रयत्न केला, आता ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याच महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि तुमची दाणादाण उडवली होती, हे विसरू नका.”

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना अत्यंत बोचरे शब्द वापरले. ते म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रातील कारखाने, जमिनी आणि राजकीय पक्ष पळवले, आता ते दैवतांवर डल्ला मारत आहेत. “गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला आले नाहीत का? तुम्हाला वारंवार आमचीच दैवतं का पळावीशी वाटतात? शिवरायांची जात काढण्यापेक्षा आधी अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण करून दाखवा,” असे आव्हानही त्यांनी दिले. उद्या हे लोक बाळासाहेब ठाकरेंवरही आपला हक्क सांगतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या विधानांमुळे भावनिक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्याबद्दलच्या कोणत्याही विधानाचे पडसाद राज्यात उमटतात. सी. आर. पाटील यांच्या या विधानामुळे भाजपची कोंडी करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता आणि शिवप्रेमी या विधानाचा निषेध करत असून, आगामी निवडणुकीत हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...