मुंबई | Mumbai
२०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा अधिकृत समावेश करण्यात आला असून ही घोषणा मुंबईत पार पडलेल्या IOC च्या १४१ व्या अधिवेशनात झाली. २०२८ च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकपासून (Cricket in Olympics) क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे.
पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. हे सामने टी२० पद्धतीचे असतील. पहिल्या तीन संघांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येईल. १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा क्रिकेट खेळले जाणार आहे.
साल १९०० मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा शेवटचा समावेश होता. त्यानंतर ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात दोन दिवसांचा सामना खेळवण्यात आला. आता ती एक अनधिकृत मॅच म्हणून गणली जाते. लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये सहा संघ टी-२० स्वरूपात खेळतील. एवढेच नाही तर आयोजकांनी संघातील खेळाडूंची कमाल संख्या देखील निश्चित केली आहे. एका संघात १५ खेळाडू असतील, असे आयोजकांनी सांगितले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटात जास्तीत जास्त ९० खेळाडूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये सहा देशांचे क्रिकेट संघ सहभागी होतील, अशी पुष्टी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOA) केली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 141 व्या सत्रात काही खेळांना समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिली आहे. ज्यामध्ये स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, क्रिकेट आणि फ्लॅग फुटबॉल यांचा समावेश आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी या सर्व खेळाचे स्वागत केले आणि विराट कोहलीचा उल्लेख केला. त्यामुळे विराट कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झालाय का? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, पात्रता प्रक्रियेबद्दल IOC कडून अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही, परंतु यजमान म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) ला थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. जर अमेरिकेला २०२८ च्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला तर पात्रतेसाठी फक्त ५ जागा रिक्त राहतील. जर संघ रँकिंगच्या आधारे पात्र ठरले तर सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे पुरुषांच्या टी-२० मध्ये जगातील टॉप-५ संघ आहेत. तर महिला टी-२० संघांच्या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या पाच स्थानांवर आहेत.
ICC चे सध्या १२ नियमित आणि ९४ संलग्न देश सदस्य आहेत. नियमित सदस्यांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या देशांचे संघ आहेत. पण २०२८च्या ऑलिंपिकसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही. क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना सर्वत्र पाहिला जातो. पण पाकिस्तान संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, आणि त्यांची संघाची टी-२० ची क्रमवारी सातव्या स्थानावर असल्याने त्यांची या स्पर्धेत खेळण्याची संधी हुकणार का, असा सवाल चाहतेच विचारत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा