मुंबई | Mumbai
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटचा (Cricket Included In Olympics Games) ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आयओसीच्या १४१ व्या अधिवेशनातील बैठकीत हा निर्णय घेतला होता. तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे.
अमेरिकेत २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शिक्कामोर्तब केले आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-२० फॉरमॅटमध्ये असेल. थॉमस बाख यांनी मतदानानंतर सांगितले की, दोन आयओसी सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले तर एक सदस्य अनुपस्थित राहिला. याशिवाय इतर सर्वांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. या प्रस्तावात क्रिकेटशिवाय सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोसचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता.
IOCचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, क्रिकेटसह इतर चार खेळांचा समावेश हा केवळ २०२८ च्या लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. ही बाब अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे आणि अमेरिकेतील तसेच जागतिक स्तरावरील नवीन खेळाडूंना आणि चाहत्यांना ऑलिम्पिक समुदायाशी संलग्न होण्यास मदत होईल. क्रिकेट टी-२० ची लोकप्रियता वाढत आहे. ५० षटकांच्या क्रिकेटने यापूर्वीच मोठे यश मिळवले आहे, असेही त्यांनी म्हटले.
यंदा पहिल्यांदाच त्या देशात आयपीएलसारखी फ्रँचायझीकेंद्री क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली. शिवाय पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपदही अमेरिकेला मिळाले आहे. थॉमस बाख म्हणले, “लवकरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आणि इतर चार खेळांचा समावेश केला जाईल. आम्ही क्रिकेटची जगभरात वाढलेली लोकप्रियता पाहत आहोत. प्रामुख्याने क्रिकेटच्या टी-२० प्रकाराचे जगभरात चाहते आहेत.”