दिल्ली | Delhi
आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार खास आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजता सामना सुरु होणार आहे. मात्र यावेळी या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता आहे. अंतिम सामन्यावरही पावसाचे संकट असल्याने खेळात व्यत्यय येऊ शकतो.
दरम्यान, या सामन्यासाठीही राखीव दिवस असणार आहे. १७ सप्टेंबरला पावसाची शक्यता असल्यास दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. म्हणजेच अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत १८सप्टेंबरलाही पाऊस पडेल का? हा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. १८ सप्टेंबर म्हणजेच राखीव दिवशीही पावसाची शक्यता ६९ % आहे. अशा परिस्थितीत १७ आणि १८ तारखेला पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. सुपर ४ मध्ये पावसाची शक्यता होती, पाऊस पडला पण सर्व सामने पूर्ण झाले. अशा परिस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामनाही पूर्ण होऊन विजेतेपद मिळणे अपेक्षित आहे.
दरम्यान आशिया चषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील ही आठवी फायनल असेल. भारताला चार वेळा फायनल जिंकण्यात यश आले आहे. त्याचबरोबर श्रीलंकन संघाने तीन वेळा फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. भारत आणि श्रीलंका हे संघ १३ वर्षांनंतर आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये शेवटचा अंतिम सामना २०१० मध्ये झाला होता. त्यावेळी भारताने धोनीच्या नेतृत्वात श्रीलंकेचा पराभव केला होता. भारत आणि श्रीलंका संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत १६६ वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने ९७ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. ११ सामन्यांचा निकाल लागला नाही.तर एक सामना बरोबरीत राहिला.