दिल्ली | Delhi
इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 67 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 20 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई संघाला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवानंतर आज मैदानात उतरेल. तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला असला, तरी गेल्या काही सामन्यांमधील दिल्लीचा फॉर्म पाहता आजचा सामना जिकणं चेन्नईसाठी आव्हान असणार आहे.
चेन्नईने 13 सामन्यांमधून 7 लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांचा संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने दिल्लीला पराभूत केल्यास त्यांना 17 गुणांची कमाई करता येणार आहे. तसेच अशा परिस्थितीत त्यांचा प्ले-ऑफमधील प्रवेशही पक्का होणार आहे, पण विजयानंतर त्यांचा संघ दुसऱ्या स्थानावर राहतो की तिसऱ्या स्थानावर त्यांची घसरण होतेय, याचे उत्तर लखनौ-कोलकता यांच्यामधील लढतीच्या निकालानंतर मिळणार आहे. चेन्नईप्रमाणेच लखनौचेही 15 गुण झाले आहेत. लखनौने कोलकताला पराभूत केल्यास चेन्नई व लखनौ यांच्यामधील सरस नेट रनरेट असणारा संघ दुसऱ्या स्थानावर राहील.
दरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी चेन्नईच्या ‘गेम प्लान’ला साजेशी आहे. त्यात धोनीचा हा स्पर्धात्मक क्रिकेटमधील दिल्लीतील अखेरचा सामनाही ठरू शकतो. यामुळे तो इथल्या परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करून सामन्यात उतरेल. ही खेळपट्टी संथ असून अशा परिस्थितीचा फायदा उठवणे चेन्नईला छान जमते.