डॉ. अरुण स्वादी
काही माणसांच्या कपाळावर जन्मतः आठ्या पडलेल्या असतात. त्यांच्या चेहर्यावर असमाधानाचे किंवा उद्विग्नतेचे असे भाव असतात की, वाटावे या जगातले ते सर्वात अतृप्त आत्मे आहेत. ‘ये दुनिया ये महफिल, मेरे कामकी नही’ म्हणत ते आपली जीवन नय्या हाकत असावेत. माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर या ग्रुपचे नेतृत्व करत असावा. आपले आडनाव त्याने इतक्या गंभीरपणे घ्यावे यातच सारे काही आले.
काही ना काही कारणाने तो चर्चेत राहतो. आता तर सोशल मीडिया त्याच्या मागे लागला आहे. कधी विराट कोहली, कधी महेंद्रसिंह धोनी तर कधी इतर कुणी; कोणाबरोबर तरी तो पंगा घेतच असतो. धोनी त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आला आहे, पण विराट मात्र ठोशास प्रतिठोसा देत राहतो. लोकांसाठी दोघांपैकी कोण जिंकतो याला फारसे महत्त्व नसते. त्यांची भरपूर करमणूक होत असते एवढेच!
मात्र, हाच गौतम गंभीर खूपदा विचारपूर्वक आपले मत मांडताना दिसतो. त्यात बराच आशय असतो. त्यावेळी गंभीरला गंभीरपणे घ्यायला पाहिजे असे वाटायला लागते. आजचे आघाडीवरचे बरेच नायक पान मसाल्याची जाहिरात करताना दिसतात. शाहरुख खान आणि अजय देवगण हे हिरो या कॅम्पेनचे सध्याचे प्रमुख आधारस्तंभ! अक्षय कुमार प्रथम त्यांना जॉईन झाला.
मग जनतेच्या रोषामुळे त्याने ही जाहिरात सोडली आणि बहुतेक त्या जाहिरातीत तो पुन्हा परतला नाही. सलमान खान, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, ऋतिक रोशन सगळे अतिरथी-महारथी पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकले आहेत. अगदी सुरुवातीला अशोक कुमार आणि शम्मी कपूर तर पानपराग से बारातीयोंका स्वागत करते थे. बिग फिश अमिताभ बच्चन आजकाल या जाहिरातीत दिसतात. या सर्वांना पैशाची चणचण भासत असेल. त्यामुळेच आपल्याला आम जनता, विशेषतः तरुणाई रोल मॉडेल समजते हे विसरून त्यांनी जाहिरातीत काम करून तंबाखूच्या प्रसाराला आपला हातभार लावला आहे.
आता या बँडवॅगनमध्ये आमचे क्रिकेटपटू पण सामील झाल्याचे दिसते. हे बरोबर नाही, असे गौतम गंभीरला वाटते. खेळाचा आणि तंबाखूचा संबंधच काय असे तो म्हणतो, पण निव्वळ पैशाकरता माजी खेळाडू त्यात सामील झालेले दिसतात आणि त्यांच्या ग्रुपमध्ये आता साक्षात सुनील गावस्कर जोडले गेले आहेत. आजकाल गावसकर समालोचक कमी आणि समुपदेशक जास्त झाले आहेत. त्यांचा क्रिकेटमधला पराक्रम एवढा मोठा आहे की ते सर्व पिढ्यांचे गुरू ठरावेत, पण आजकाल ते चोपतात जास्त आणि मोलाचा सल्ला कमी देतात.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आयन चॅपेल असेच काहीतरी करायचा, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू चॅपेलच्या अश्लाघ्य टीकेला किती भीक घालायचे हे त्यांनी पाहिले आहे. पानमसाल्यात तंबाखू आहे का? त्याची कारसिनोजेनेसिटी किती? याविषयी उलटसुलट चर्चा होत असते, पण ते एकदम कॅन्सर फ्री आहे, असा निष्कर्ष कोणत्याही लॅबने काढल्याचे ऐकिवात नाही. मग तो कोणता पण मसाला आहे, याने फारसा फरक पडत नाही. गावस्कर, कपिल देव, वीरेंद्र सेहवाग ही फार मोठी हस्ती आहेत. त्यांचे फॅन फॉलोइंग मोठे आहे. त्यांनी दोन चार कोटीसाठी (कोणी म्हणतात 20 कोटी ) हा सौदा करावा हे काही सद्सद्विवेक बुद्धीला पटत नाही. मात्र अशा दिग्गजांना खडसावून जाब विचारण्याचे धैर्य गौतम गंभीरने दाखवले याबद्दल त्याचे अभिनंदन केलेच पाहिजे!
सचिन तेंडुलकर क्रिकेटमधला देव आहे, असे का म्हटले जाते याची असंख्य कारणे आहेत. एक कारण गंभीरने सांगितले आहे. ते म्हणजे सचिनने कोणत्याही प्रकारच्या तंबाखू सेवनाची जाहिरात करायचे कटाक्षाने टाळले. आपल्या वडिलांचा उपदेश म्हणा, सल्ला म्हणा, तो शिरसावंद्य मानून करोडोंचा मोह टाळला आहे. देवपण हे असे मिळते. तरुणांचा आदर्श असावा तर असा..! यूथ आयकॉन असावा तर असा!