Monday, August 17, 2026
Homeक्राईमCrime Diary : ड्रग्स पकडले; पण साखळीचा माग कधी लागणार?

Crime Diary : ड्रग्स पकडले; पण साखळीचा माग कधी लागणार?

तोफखाना, एमआयडीसी पोलिसांनी पकडलेल्या ‘एमडी’ तस्करीच्या मुळापर्यंत तपास नाही

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

शहरासह जिल्ह्यात गांजा या अमली पदार्थाच्या तस्करीपुरतीच समस्या मर्यादित राहिलेली नसून, आता एमडीसारख्या घातक आणि तरूणाईला उद्ध्वस्त करणार्‍या ड्रग्सचीही तस्करी होत असल्याचे गेल्या काही कारवायांतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, तोफखाना आणि एमआयडीसी पोलिसांनी अलीकडे केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आले. संशयास्पद हालचालींच्या आधारे योगायोगाने हाती लागलेल्या या कारवायांचे कौतुक झाले; मात्र हे ड्रग्स आले कुठून, मुख्य पुरवठादार कोण आणि अहिल्यानगरमध्ये त्याची वितरण साखळी कोण चालवते, या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरितच आहेत. त्यामुळे ड्रग्स पकडले, पण ड्रग्सची साखळी कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 155 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. सुरूवातीला चौघांना अटक करण्यात आली. तपास पुढे नेत आणखी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 10 संशयित निष्पन्न झाल्याचे समोर आले. यातील दोन संशयित पुणे येथील असल्याचे तपासात पुढे आले असून, ड्रग्सचा पुरवठा पुण्यातून झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, पुण्यातील या दोघांपर्यंत तपास यंत्रणा अद्याप पोहोचलेली नसल्याने या प्रकरणातील मुख्य पुरवठादार कोण, याचा उलगडा झालेला नाही. विशेष म्हणजे, तोफखाना पोलिसांची ही कारवाई कोणत्याही ठोस खबर्‍याच्या माहितीवर झालेली नव्हती. पोलीस गस्तीवर असताना संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि त्यातून एमडीचा मोठा साठा हाती लागला. म्हणजेच, पोलिसांच्या हाती आलेला हा साठा हा एका मोठ्या रॅकेटचा केवळ छोटासा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी पकडलेल्या आरोपींपुरता तपास मर्यादित न ठेवता ड्रग्सचा स्त्रोत, पुरवठादार, वाहतूकदार आणि स्थानिक विक्रेत्यांची संपूर्ण साखळी उघड करणे अपेक्षित होते.

दुसरीकडे एमआयडीसी पोलिसांनीही गस्तीवर असताना एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 29 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. हा तरूण मूळचा राजस्थानचा असून सध्या सोलापूर येथे राहत असल्याचे तपासात समोर आले. त्याच्यासोबत असलेल्या साथीदारालाही नंतर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. मात्र, या प्रकरणातही ड्रग्सचा मूळ स्त्रोत आणि मुख्य पुरवठादार कोण, याचा शोध अद्याप लागलेला नाही. राजस्थानपर्यंत तपासाची व्याप्ती पोहोचली का, तेथून ड्रग्स आणण्यामागे कोण आहे, सोलापूरमार्गे अहिल्यानगरमध्ये त्याचा पुरवठा करणारे कोण आहेत, याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. युवा पिढीचे संरक्षण आणि जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या उपक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे पोलिसांच्या या मोहिमेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेतही अहिल्यानगरच्या भौगोलिक स्थितीचा आणि पुणे, नाशिक व मुंबईसारख्या मोठ्या शहरांशी असलेल्या जवळिकीचा उल्लेख केला होता. एमडीसारख्या अंमली पदार्थांची गुप्त मार्गाने तस्करी व विक्री होत असल्याचे तपासातून समोर येत असून, केवळ स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई न करता मुख्य पुरवठादार आणि संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी विशेष तपास पथके काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर तोफखाना आणि एमआयडीसी पोलिसांच्या दोन कारवायांकडे पाहिले तर स्थानिक पातळीवरील आरोपी पकडले गेले असले तरी मुख्य पुरवठादार आणि ड्रग्सची संपूर्ण साखळी अद्याप तपासाच्या कक्षेबाहेरच असल्याचे चित्र आहे. हीच बाब चिंताजनक आहे.

पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम तीव्र केल्याचा संदेश दिला आहे. आता त्या मोहिमेचे पुढचे पाऊल नागरिकांना प्रत्यक्ष कारवाईतून दिसणे अपेक्षित आहे. योगायोगाने हाती लागलेले ड्रग्स पकडणे ही कारवाईची सुरूवात आहे; मात्र त्या ड्रग्सचा उगम शोधून संपूर्ण साखळी उध्दवस्त करणे हेच पोलिसांसमोरील खरे आव्हान आहे. अन्यथा एकीकडे अंमली पदार्थमुक्त अहिल्यानगरचा नारा दिला जाईल आणि दुसरीकडे शहराच्या विविध भागांत ड्रग्सचा पुरवठा सुरूच राहील.

सावेडी ‘टार्गेट’वर ?
सावेडी उपनगर हे शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखले जाते. याच परिसरात तोफखाना पोलिसांनी एमडी जप्त केले. त्यामुळे सावेडी परिसरात ड्रग्सचा पुरवठा किंवा विक्रीचे जाळे कितपत विस्तारले आहे, याचा स्वतंत्रपणे तपास होण्याची गरज आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, तरूण वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील युवकांना ड्रग्सच्या जाळ्यात ओढले जात नाही ना, याकडेही पोलिसांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि संवेदनशील भाग येतात. त्यामुळे या ठाण्याला अनुभवी आणि सक्षम प्रभारी अधिकार्‍याची आवश्यकता असल्याची चर्चा पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये आहे.

‘साखळी’ तोडल्याशिवाय मोहीम अपुरी
अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे; मात्र जनजागृतीसोबत पुरवठा करणार्‍यांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई होणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा विक्रेता पकडला, त्याच्याकडील एमडी जप्त केले आणि गुन्हा दाखल केला, एवढ्यावर कारवाई थांबली तर काही दिवसांनी त्याची जागा दुसरा विक्रेता घेऊ शकतो. कोणत्या मार्गाने ड्रग्स अहिल्यानगरमध्ये येतात आणि या व्यवहारामागे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती किंवा संघटित टोळी आहे का, या सर्व बाबींचा तपास होणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पवारांकडून जिल्हा बँकेबाबत चाचपणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्हा बँकेच्या होवू घातलेल्या निवडणुकीबाबत रविवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय स्थिती जाणून घेत काय भूमिका घेता...