अहिल्यानगर|सचिन दसपुते|Ahilyanagar
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अमोल भारती यांची नुकतीच शिर्डी विभागात बदली झाली असून, अहिल्यानगरकरांत त्यांच्या दीड वर्षांच्या कार्यकाळाची मोठी चर्चा आहे. कठोर कारवाई, न्यायप्रिय वृत्ती आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबतची तळमळ या गुणांमुळे भारती यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. उपअधीक्षक भारती यांच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका, जातीय तेढ निर्माण करणार्या वक्तव्यांवरून निघालेले मोर्चे, धार्मिक उत्सव अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे काम केले. आता शिर्डीसारख्या धार्मिक ठिकाणी सुरू असलेल्या गुन्हेगारीचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. अहिल्यानगरमधील त्यांची कार्यपध्दती पाहता, शिर्डीकरांनाही सक्षम ‘पोलिसिंग’ अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये भारती यांनी अहिल्यानगर शहर उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्याच काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय आणि सामाजिक तणावाची शक्यता वाढली होती. मात्र तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, कोतवालीचे निरीक्षक प्रताप दराडे आणि भिंगारचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर या मजबूत टीमच्या साहाय्याने त्यांनी संपूर्ण शहरात शांतता अबाधित ठेवली. निवडणुक म्हटले की राजकीय नेते, कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होते. यातून राजकीय, धार्मिक वक्तव्यातून तेढ निर्माण होतात. उपअधीक्षक भारती यांच्या काळात लोकसभा निवडणुक शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दोन समाजाच्या गटांत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करून काही लोकांकडून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला.
वक्तव्यामुळे समर्थनाअर्थ व विरोधात अहिल्यानगर शहरात मोर्चे निघाले. या मोर्चातही तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात आल्याने शहराचे वातावरण बिघडण्याचा प्रयत्न झाला. मात्र उपअधीक्षक भारती व त्यांच्या जोडीला असलेल्या कोकरे-दराडे-मुलगीर जोडीने शहरातील शांतता राखण्यात यश मिळविले. भारती यांच्या कार्यकाळात दोन मोहरम व एक गणेशोत्सव शांततेत पार पडले. खूनाच्या प्रकरणात ‘मकोका’ कारवाई करून त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसविला. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी भारती यांनी कोणतीही तडजोड केली नाही. अंकुश चत्तर खून प्रकरणातील माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्याच्या टोळीवर, तसेच वैभव नायकोडी खून प्रकरणातील टोळीवर ‘मकोका’ लावण्यात आला. एवढ्यावरच थांबता न राहता, त्यांनी ठोस पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले. या काटेकोर भूमिकेमुळे गुन्हेगारांमध्ये भीती तर नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला.
अहिल्यानगर शहरात निघणार्या श्रीराम नवमी मिरवणुक मार्ग बदल्याचा घाट काही लोकांनी घातला. मात्र मार्गात बदल केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून अशावेळी भारती यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाने ठरविलेल्या मार्गावरच मिरवणूक काढली, त्यामुळे संभाव्य तणाव टळला. एकूणच, अमोल भारती हे धडाडीचे, न्यायप्रिय आणि गुन्हेगारीवर कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून अहिल्यानगरकरांच्या कायमच्या आठवणीत राहतील. आता शिर्डी विभागातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
अहिल्यानगरकरांच्या मनात ठसा
उपअधीक्षक भारती यांची कार्यपध्दती अशी की गंभीर गुन्हा घडल्यानंतर ते स्वतः घटनास्थळी दाखल होत. स्थानिक पोलिसांना मार्गदर्शन करणे, आरोपींना अटक करण्यास प्राधान्य देणे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य सूत्र राहिले. काम करणार्या पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. अहिल्यानगर शहरात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार्या घटना नेहमीच घडतात. मात्र भारती यांनी प्रत्येक वेळेस तातडीने प्रतिसाद देत वातावरण नियंत्रणात ठेवले. त्यामुळे ते अहिल्यानगरकरांच्या कायमच्या आठवणीत राहतील, याबाबत शंका नाही.
शिर्डीतील नवी आव्हाने
अहिल्यानगरमधील कार्यकाळ दोन वर्ष राहील, अशी अपेक्षा होती. परंतु शिर्डी विभागातून आलेल्या मागणीमुळे त्यांची बदली झाली. शिर्डी धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मानली जाते. येथे वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण, अमली पदार्थांचे जाळे आणि महिला विषयक गुन्हे या समस्या गंभीर आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे, हेच भारती यांच्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. अहिल्यानगरमधील अनुभव पाहता, शिर्डीकरांना देखील सक्षम ‘पोलिसिंग’ अनुभवायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अहिल्यानगर उपअधीक्षकांच्या प्रतिक्षेत
दरम्यान, उपअधीक्षक भारती यांच्या बदलीनंतर अहिल्यानगर शहर उपअधीक्षकाची खुर्ची रिक्त आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना अनुभवी आणि खमक्या अधिकार्याची अहिल्यानगरला नितांत गरज आहे. खात्यात नवीन असलेला किंवा पोलीस निरीक्षक पदावरून उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळालेला अधिकारी आल्यास त्यांच्यात अनुभवाचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे थेट उपअधीक्षक म्हणून निवड झालेला व अनुभवी अधिकारी अहिल्यानगरकरांना मिळावा, अशी अपेक्षा आहे.




