Thursday, January 29, 2026
Homeक्राईमAhilyanagar : आर्थिक गुन्ह्यांचा स्फोट आणि पोलिसांची कसोटी!

Ahilyanagar : आर्थिक गुन्ह्यांचा स्फोट आणि पोलिसांची कसोटी!

गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी अडकले || तपासावर विश्वासाचं आव्हान

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणार्‍या आर्थिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला अधिक बळकटी देत तपास प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनुभवी अधिकारी व अंमलदारांची नेमणूक करून शाखेची ताकद वाढवण्यात आली आहे. मात्र, गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रूपये अडकलेल्या शेवगाव शेअर मार्केट, ग्रो मोअर, इन्फानाईट, सिस्पे आदी कंपन्यांच्या फसवणूक प्रकरणांमध्ये संशयित आरोपींना अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. शेकडो कोटी रूपयांचे गुंतवणूक घोटाळे, त्यात बळी पडलेले शिक्षक, शेतकरी, पोलीस, उद्योजक, तरूण आणि सर्वसामान्य नागरिक. ‘ग्रो मोअर’, ‘इन्फानाईट’, ‘सिस्पे’, ‘नगर अर्बन’ आणि ‘शेवगाव शेअर मार्केट’ यांच्यासह पतसंस्था व विविध कंपन्यांमधील आर्थिक घोटाळ्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेला अधिक सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपअधीक्षक यांच्या साथीला आता एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक व एक उपनिरीक्षक दिले आहेत. काही नवीन अंमलदार या शाखेला दिले आहे. त्यांच्यासमोर फसवणुक करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्याचे आव्हान आहे.

YouTube video player

‘ग्रो मोअर’ कंपनीकडून शिर्डी, राहाता परिसरातील सर्वसामान्य लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली. ‘चांगला परतावा’ या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची लूट झाली. शिर्डी व राहाता पोलीस ठाण्यांत अनुक्रमे 1.65 कोटी व 37 लाखांचे गुन्हे दाखल झाले असले, तरी प्रत्यक्षात 865 कोटी रूपयांचा व्यवहार संशयित आरोपींच्या बँक खात्यांमध्ये झाल्याचे उघड झाले आहे. मुख्य संशयित आरोपी भूपेंद्र सावळेला अटक झाल्यानंतर त्याने एलसीबीच्या काही पोलिसांना दीड कोटी रूपये ऑनलाईन दिल्याची कबुली दिली आहे. यावरून संबंधित पोलिसांवर कारवाई झाली. मात्र या घोटाळ्यात 250हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. इतर संशयित आरोपी अद्याप मोकाट असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार, ही अपेक्षा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे.

इन्फानाईट, सिस्पेसह इतर कंपन्यांच्या नावाखाली नवनाथ औताडे व त्याच्या टोळीने शेकडो कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 78.50 लाख व तोफखाना पोलीस ठाण्यात 28 लाखांची फसवणूक दाखल असली, तरी हे फक्त हिमनगाचे टोक आहे. या प्रकरणात पोलिसांनी फक्त दोन संशयित आरोपींना अटक केली असून इतर मोकाट आहेत. विशेष म्हणजे या टोळीने सोशल मीडियावर गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील, अशी खोटी आश्वासने देत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू केला आहे. या दोन्ही गुन्ह्यातील औताडेसह इतर संशयित आरोपींना अटक करण्याची हिंमत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दाखवावी लागेल आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळून द्यावे लागतील.

नगर अर्बन घोटाळ्यात सुमारे 291 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त संशयितांची नावे समोर आली असून फक्त 18 संशयित आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. प्रमुख सूत्रधार अजूनही पसार आहे. या प्रकरणामुळे आर्थिक गुन्हे शाखेची कार्यक्षमता प्रश्नाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

शेवगावमधील शेअर मार्केट घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात लोकांना परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक उकळली गेली. या प्रकरणात 45 गुन्हे दाखल झाले असून 39 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यातील काही संशयितांना अटक करून स्थानिक पोलिसांनी त्यांच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 6 गुन्ह्यांचा तपास रखडलेला असून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामध्ये फसवूकीची रक्कम मोठी आहे. त्यातील प्रमुख सूत्रधारांना अटक करण्याचे आव्हानही आर्थिक गुन्हे शाखेसमोर आहे.

न्याय मिळेल का ?
फसवणूक करणार्‍या संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुंतवणूकदारांचे पैसे काढणे हे उद्दिष्ट सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पुढे आहे. लोकांच्या विश्वासाची पुनर्स्थापना आणि पोलीस खात्याच्या प्रतिमेचे रक्षण हे या सर्व तपासांची खरी कसोटी ठरणार आहे. फक्त संशयित आरोपी अटकेत असणे पुरेसे नाही, तर संपत्ती जप्त करून त्यातून लोकांचे पैसे परत मिळवण्याचे ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. सध्या जिल्ह्यातील गुंतवणूकदार अशा स्थितीत आहेत की, त्यांना न्याय मिळेल का, हा प्रश्नच आहे. पोलीस यंत्रणेकडे त्यांची शेवटची आशा आहे. ही आशा पोलिसांनी सार्थ करून दाखवली, तरच लोकांचा विश्वास टिकेल. नाहीतर, मोजकेच संशयित अटक करून, तपास थंडवला हा आरोप भविष्यात अधिक गडद होईल.

‘पोलीस एजंट’चा प्रश्न अधिक गंभीर
इन्फानाईट प्रकरणात पोलिसांच्या गोटातीलच काही ‘एजंट’ गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रूपयांची ‘टोपी’ घालून मोकाट फिरत आहेत. या एजंटांनी पोलीस ठाण्यांत व अधीक्षक कार्यालयात मोकळ्या मनाने वावर कायम ठेवला आहे. खाकी वर्दीची प्रतिमा धुळीला मिळवत हे एजंट अजूनही बिनधास्त फिरत असल्याची चर्चा पोलिसांतूनच ऐकू येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेला त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक ठरत आहे. आपल्याच बांधवांना ‘टोपी’ घालणार्‍या पोलीस दलातील ‘एंजट’ला शोधून त्यांना या गुन्ह्यात आरोपी करणे आवश्यक असून अधीक्षक घार्गे यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...