अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यात गुन्हेगारीने उंबरठा ओलांडला असताना, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) या सर्वांत प्रभावशाली तपास यंत्रणेचा दबदबा कुठेतरी कमी होत चालल्याचे भयावह वास्तव समोर येत आहे. एलसीबी हे नाव ऐकताच गुन्हेगारांच्या कपाळावर घाम फुटावा, अशी ताकद या यंत्रणेमध्ये आहे; पण सध्याची स्थिती पाहता, वरिष्ठांचा एलसीबीवरील विश्वास कमी झाल्याचे चित्र आहे. कारण पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून अवैध धंद्यावर छापेमारी सुरू केली. त्यामुळे एलसीबीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एलसीबीवर ठसठशीत हस्तक्षेपाची वेळ आली आहे. ‘मक्तेदारी’, ‘राजकीय शिफारस’ युगाचा अंत आवश्यक आहे. नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे नक्की बदल करतील, अशी अपेक्षा पोलीस दलात निर्माण झाली आहे.
एलसीबी हे कोणत्याही जिल्ह्याचे ‘स्पेशल फोर्स’ असते. त्यात काम करण्यासाठी पात्रता, तडफ आणि कार्यक्षमतेची गरज असते. जर ही यंत्रणा साचलेल्या पाण्यासारखी बनली, तर गुन्हेगारीचा मुकाबला करणे कठीण होईल. सध्या पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे की, एलसीबी ही ठराविक अंमलदारांची ‘मक्तेदारी’ झाली आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करूनही काही अंमलदार वर्षांनुवर्षे एलसीबीमध्येच स्थिरावले आहेत. जे अनुभवसंपन्न असूनही नवीन अंमलदार एलसीबीमध्ये नियुक्त व्हावेत म्हणून आग्रही आहेत, त्यांना डावलले जाते. हे सर्व काही ‘शिफारसशाही’चे जिवंत उदाहरण आहे. पूर्वीच्या पोलीस अधीक्षकांनी (मनोज पाटील, राकेश ओला) केलेल्या बदल्यांनंतरही अनेक अंमलदार आजतागायत मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त झालेले नाहीत, ही बाब धक्कादायक आहे. गुन्हेगारी विरोधी मोहिमा, अवैध धंद्यांवर कारवाया, मोठ्या गुन्ह्यांचा तपास या सर्व जबाबदार्या एलसीबीच्या खांद्यावर असतात. त्यामुळे एलसीबी म्हणजे ‘मलिदा मिळवण्याचे ठिकाण’ असा ठसठशीत समज पोलीस खात्यात दृढ झाला आहे.
एलसीबीच्या प्रभारी पदासाठी कोटींचे ‘उडाणे’ घेतले जातात, ही बाब सर्वश्रूत असली तरी यावर आजवर कुणीही पध्दतशीर हस्तक्षेप केलेला नाही. आता यावर लगाम घालण्याची संधी पोलीस अधीक्षक घार्गे यांना आली आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता, फक्त अनुभव आणि क्षमतेच्या आधारावर एलसीबीमध्ये नवीन नेमणुका कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एलसीबीत सध्या अनावश्यक संलग्न अंमलदारांची संख्या वाढली, मूळ नेमणूक धारक कमीच असल्याचे चित्र आहे. संलग्न अंमलदार असल्याने त्यांना काम करताना अनेक अडचणी येतात. मूळ नियुक्ती मिळत नसल्याने ते म्हणावा तसा ठसा कामातून उमटवत नाहीत. पोलीस दलात अनेक अनुभवी अंमलदार आहेत. एलसीबीत नेमणूक मिळून काम करण्याची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, प्रशासकीय बदलीच्या वेळी अनेक अंमलदार आपल्याला एलसीबीत नेमणूक मिळावी, अशी इच्छा व्यक्त करत असतात. मात्र ठराविक अंमलदारांच्या मक्तेदारीमुळे अनुभव असूनही नव्या अंमलदारांना संधी नाकारली जाते. एखाद्या पोलीस ठाण्यात/शाखेत कोणत्याही पोलीस अंमलदाराला फक्त पाच वर्षांसाठी नियुक्ती दिली जाते. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो प्रशासकीय बदलीसाठी पात्र असतो.
मात्र एलसीबीत पाच वर्षांची नियुक्तीची मर्यादा फसवून वर्षांनुवर्षे तेच चेहरे कायम आहे. हा प्रकार कुठेतरी पोलीस खात्यातील नियम डावलून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यावर कोणीच बोलत नाही, निर्णय घेत नाही. अधीक्षक घार्गे यांच्याकडून ‘मक्तेदारी’ मोडीत काढण्याची अपेक्षा आहे. कोणताही आणि कसाही गुन्हा असो तो उघडकीस आणण्याची ताकद एलसीबीत आजही आहे. आजही त्यांच्याकडून काम सुरू आहे. मात्र अवैध धंद्यावर छापेमारी करण्यासाठी अधीक्षक घार्गे यांनी स्वतंत्र पथक स्थापन केल्याने अवघ्या जिल्ह्यात गुन्हे उकलण्याची क्षमता असतानाही त्यांच्यातील विश्वास कमी झाल्याचे दिसत आहे. अधीक्षक घार्गे यांना एलसीबीत बदल करायचा असेल तर त्यांनी तो करावा आणि पुन्हा एलसीबी नव्या जोमाने कार्यरत करावी, अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त होत आहे.
‘सत्ता’ नव्हे तर ‘कामगिरी’ हेच मापदंड
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पदभार हाती घेतल्यापासून चूक करणार्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. चुकीच्या वर्तणुकीबाबत त्यांनी यापूर्वी काही अंमलदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. एलसीबीत ‘मलिदा’ मिळतो म्हणून अनेकांचा नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू असतो. मात्र आता काम करणार्यांना एलसीबीत संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलसीबीमध्ये आता ‘सत्ता’ नव्हे तर ‘कामगिरी’ हेच मापदंड ठरणार आहेत.
पोलीस दलात आशेचा नवा किरण
जिल्हा पोलीस दलात अनेक असे अंमलदार आहेत, ज्यांच्याकडे गुन्ह्यांच्या तपासाचा अफाट अनुभव आहे. मात्र त्यांना फक्त शिफारस नसल्यामुळे संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती बदलावी लागेल. अधीक्षक घार्गे यांनी आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे यासारख्या विशेष शाखांमध्ये पात्र आणि अनुभवी अंमलदारांना संधी दिली. त्यामुळे एलसीबीमध्येही आता नवीन अंमलदारांना संधी मिळणार, अशी अपेक्षा आहे. जुने अंमलदार त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत पाठवले जातील आणि नवे अंमलदार नव्या जोमाने कार्यरत होतील, अशी अपेक्षा आहे.





