नाशिक। प्रतिनिधी Nashik
जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून मामाने साथीदारांसह ४१ वर्षीय भाच्यावर बंदुकीतून तीन गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर शनिवारी (दि. २१) रात्री ८ वाजेदरम्यान घडली. पोलिसांनी मृताचा मामा गोविंद रामा दाभाडे याच्यासह अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. निलेश रामचंद्र परदेशी (वय ४१, रा. पाचआळी, गढई, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश रामचंद्र परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
निलेश परदेशी यांची निलगिरी पर्वतामागे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. जव्हार रोड, भगवती नगर रोड नावाच्या कमानीजवळील जमिनीवरून परदेशी आणि त्यांचे मामा गोविंद रामा दाभाडे यांच्यामध्ये मालकी हक्कावरून वाद सुरु आहे. हा टोकला गेला होता. ते शनिवारी (दि.२१) सायंकाळी ७ वाजेदरम्यान शेतजमिनीत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर जमिनीच्या वादातूनच संशयितांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
परदेशी यांच्या पोट, छाती व तोंडात गोळ्या लागल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करत परदेशी यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल केले. तपास पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.
शरीरातून काढल्या तीन गोळ्या
निलेश परदेशी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.२२) दुपारी दाखल करण्यात आला. शवविच्छेदन विभागातील डॉ. दिनेश पवार व डॉ. एच. ओ. डी. बुक्तार यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करत पोटातून दोन व हनुवटीजवळ अडकलेली एक अशा एकूण तीन गोळ्या बाहेर काढल्या. शवविच्छेदनानंतर या गोळ्या व मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.