Saturday, July 27, 2024
Homeनगरवैजापूर तालुक्‍यात शेतवस्तीवर धाडसी दरोडा; पोलीस-दरोडेखोरांत जोरदार धुमश्चक्री, फायरिंग

वैजापूर तालुक्‍यात शेतवस्तीवर धाडसी दरोडा; पोलीस-दरोडेखोरांत जोरदार धुमश्चक्री, फायरिंग

वैजापुर | बातमीदार

वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीत व मनेगाव शिवारात चोरट्यांच्या टोळीने कुटुंबास जबर मारहाण करीत दरोडा टाकत 45 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

- Advertisement -

रात्री शिऊर पोलिसांनी दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या तर इतर चोरट्यांचा शोध घेत असताना संशयित चोरटे पोलिसांना हे जानेफळ शिवारात एका शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने,स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जानेफळ शिवारात त्यांचा शोध सुरू केला. मात्र पोलिसांवर या चोरट्यांनी दगडफेक करीत व धारधार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान आपला बचाव करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार देखील केला. या गोळीबारात एक चोरटा जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती शिऊर पोलिसांनी दिली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मनेगाव शिवारातील शेतवस्तीवर राहणारे विष्णू पंढरीनाथ सुराशे (वय 50 वर्षे) हे त्यांच्या पत्नी हिराबाई व मुलगा रुपेश यांच्यासह बुधवारी रात्री झोपी गेले. रात्री 11 वाजेच्य सुमारास त्यांना त्यांचा मुलगा रुपेश याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने ते उठले व बघण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या मुलाला 2-3 जण मारहाण करत असल्याचे त्यांना दिसले. काही लोक त्यांच्या घराच्या ओट्याजवळ उभे असल्याचे देखील त्यांना दिसले. चोरट्यापैकी काहींनी त्यांना मारून जखमी केले. जसे तसे त्यांनी तेथून सुटून त्यांचे चुलत भाऊ बाबुराव सुरासे यांच्या शेतवस्तीकडे ते पळाले. गोंधळाचा आवाज ऐकून सूराशे यांची पत्नी उठल्या त्यांना ही चोरट्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील सोने चांदीचे दागिने व मोबाईल असा 45 हजारांचा ऐवज हिस्कावल्या प्रकरणी विष्णू सुरशे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपी जानेफळ शिवारात एका शेतात लपून असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जानेफळ शिवारातील बिबटे वस्ती येथे पोहचले. त्यांना बघताच चोरटयांनी त्यांच्यावर दगडफेक केली. पोलिसांनी शिताफीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात उपनिरीक्षक दुल्लत, पोलिस हेड कॉन्स्टेबल वाल्मीक निकम, व संजय घुगे हे जखमी झाले आहे.

तर प्रकरणात शिऊर पोलिसांनी रात्रीच दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले तर मूठभेडीत स्थानिक गुन्हे शाखेने जानेफळ येथून चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलीस करीत आहे. तर यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर हल्ला केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या