अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निंबळक व नागापूर परिसरात दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही जणांनी हातात तलवारी, लोखंडी रॉड, घण व इतर शस्त्रे घेऊन थेट जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यांतील पसार संशयित आरोपींना अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे.
अभिषेक उर्फ भोर्या भिंगारदिवे (वय 19), गणेश सोन्याबापु कदम (वय 19), आशुतोष अंतोन पाटोळे (वय 20) व सार्थक राजु विधाटे (वय 19) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. 2 मार्च रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र पोपट कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे नातेवाईक संदीप कोतकर यांच्या गणेश किराणा स्टोअर्स समोर काही संशयित आरोपींनी हातात तलवार, घण, रॉड व लाकडी दांडक्यांसह येऊन थेट हल्ला चढवला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
15 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वर बाळु साठे यांच्यावर सम्राट चौक, नागापूर येथे जात असताना अभिषेक उर्फ भोर्या भिंगारदिवे व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्रे व लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी (4 तोळे) आणि रोख 9 नऊ 200 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणात देखील एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यातील पसार संशयितांना अटक करण्यात आली आहे. सपोनि माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.