Sunday, September 8, 2024
Homeनगरमोकाट जनावरे पकडणार्‍या मनपा पथकाला धक्काबुक्की

मोकाट जनावरे पकडणार्‍या मनपा पथकाला धक्काबुक्की

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोकाट जनावरे पकडणार्‍या महापालिकेच्या पथकातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. येथील जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील गवळीवाडा येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मनपा कोंढवाडा विभागाचे सुफरवायझर ज्ञानेश्‍वर शिवाजी झरेकर (रा. कल्याण रोड, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहीत हुच्चा (रा. गवळीवाडा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून छोटे-मोठे अपघात होत आहे. येथील वाहतुक शाखेने 18 ऑगस्ट रोजी मनपाला पत्र पाठवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सुफरवायझर झरेकर यांच्यासह गणेश रोहकले, नजीम सय्यद, गणेश औताडे हे मोकाट जनावरे पकडण्यासाठी गवळीवाडा येथे गेले असता रोहीत हुच्चा तेथे आला.

त्याने मनपा पथकाला जनावरे पकडण्यास विरोध करून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ‘मी जनावरांचा मालक असून माझी जनावरे तुम्ही नेल्यास तुम्हाला जीवे मारून टाकीन’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या