नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवैध सावकारी आणि फसवणूक (Fraud) करणारा संशयित अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) याने शिर्डी (Shirdi) येथील शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्या फसवणूक प्रकरणात जमिनीचा व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे. गुन्हा मान्य असल्याचे त्याने शिर्डी पोलिसांना सांगितले असून या गुन्ह्यातील कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी (दि. ९) शिर्डी पोलिसांनी त्याचा ताबा पुन्हा नाशिकच्या विशेष तपास पथकाकडे सोपवला.
शिर्डी पोलीस ठाण्याचे (Shirdi Police Station) उपनिरीक्षक निवांत जाधव आणि त्यांच्या पथकाने खरातची चौकशी केली. या चौकशीत खरातने गोंदकर यांच्यासोबत जमिनीचा व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, ‘मी कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले नाही किंवा त्याबाबत कोणतीही चर्चा केली नाहीं’ असा पवित्रा घेत त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात, गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खरातने दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे देऊन त्यांच्या शिर्डी परिसरातील चार एकर जमिनीचे खरेदीखत स्वतःच्या नावावर करून घेतले होते. सर्व पैसे व्याजासह परत करूनही जमीन परत न देता खरातने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, खरात ५२ दिवसांपासून पोलीस कोठडीत असून त्याच्यावर नाशिकमधील (Nashik) नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटीने पूर्ण केल्यानंतर शिर्डीतील दहाव्या गुन्ह्यात त्याला ४ मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते. आता या गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर पूर्ण झाल्याने त्याला पुन्हा नाशिकला हलवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता अकराव्या गुन्ह्यात एसआयटी त्याला पुन्हा अटक करण्याची शक्यता असून, खरातचा कोठडी ते न्यायालय व तुरुंग असा प्रवास आणखी २० ते २५ दिवस अविरत सुरूच राहणार आहे.
पत्नी कल्पना खरात अद्याप नॉट रिचेबल
या संपूर्ण रॅकेटमध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हीदेखील मुख्य संशयित आहे. गेल्या चार आठवड्यांपासून पोलीस तिच्या मागावर आहेत, मात्र ती अद्याप हाती लागलेली नाही. खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि किरण नानासाहेब सोनवणे (रा. निमगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), अरविंद पांडुरंग बावके (रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), अशोक परबत तांबे (रा. शिर्डी) या पाच संशयितांनी सावकारीचे जाळे विणल्याचे समोर आले होते.
नेमके निष्पन्न काय?
खरातवर दाखल असलेल्या सतरापैकी दहा गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत नेमके काय ठोस पुरावे हाती लागले आहेत, हे अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहे. तरी खरातने शिर्डीतील जमीन फसवणुकीच्या गुन्ह्यात दिलेली कबुली या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.





