नाशिक | Nashik
महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने भोंदू कॅप्टन अशोक खरातला (Ashok Kharat) दि.१८ मार्च रोजी अटक केली. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी सरकारने एसआयटी (SIT) स्थापन करून खरातची सखोल चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज्यातील बड्या नेत्यांचा तो महागुरू असल्याचे त्याच्यासोबत असणाऱ्या फोटोवरून समोर येत आहे. त्यामुळे बरेच राजकारणी अडचणीत आले आहेत. अशातच आता खरातने लोकसभा (Loksabha)निवडणुकीचे निकाल बदलण्याचे आश्वासन उत्तर महाराष्ट्रातील एका महिला नेत्याला दिल्याची माहिती एसआयटीच्या चौकशीदरम्यान समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकांवेळी उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) एका महिला नेत्याने भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची बोलले जात आहे. या महिला नेत्यास त्याने “धक्कादायक निकाल लावून देतो” असे म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर एसआयटीकडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याशिवाय खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार जात होते, असे समजते. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ही महिला नेता नेमकी कोण आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, विकृत खरातने “तुर्की मधाच्या” विक्रीतून लाखो रुपये कमविल्याचे समोर आले आहे. यात एका किलो मधाची किंमत तब्बल ९ लाख रुपये ठेवली जात होती. हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून मिळतो, असा खोटा दावा करून विश्वास संपादन करत त्याने उद्योजक आणि राजकीय नेत्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून मिळालेली मोठी रक्कम खरातने आपल्या ट्रस्टच्या नावावर जमा करत असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता खरातच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.





