अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पदमपूरवाडी (ता. नगर) शिवारात चार जणांनी मिळून वृध्दाच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत कुर्हाडीने मारहाण केली, तर भांडण सोडवायला आलेल्या त्यांच्या पुतण्यावर चाकूने वार करण्यात आला. नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल भानुदास माळी, रोहन भाऊसाहेब माळी, विशाल भाऊसाहेब माळी व बाळू भाऊसाहेब माळी (सर्व रा. पदमपूरवाडी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी बाबासाहेब मारूती गोलवड (वय 55, रा. पदमपुरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांचा पुतण्या रोहित बबन गोलवड हे देखील जखमी झाले आहेत. फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना रात्री साडेदहाच्या सुमारास संशयित आरोपी हे त्यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीला विचारले की, सागर इकडे आला का? फिर्यादीने त्यास नकार दिल्यावर संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रोहन माळी याने हातातील कुर्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण करून दुखापत केली, तर राहुल माळी याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीचा पुतण्या रोहित गोलवड आला असता, बाळू माळी याने त्याच्यावर चाकूने वार करून उजव्या हाताच्या बोटाला दुखापत केली. या घटनेनंतर संशयित आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस अंमलदार पालवे अधिक तपास करत आहेत.