श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
15 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईलवर नग्न फोटो पाठवणारा बेलापूरचा 32 वर्षीय योगेश पवार याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलापूर बुद्रुक येथील योगेश साहेबराव पवार (रा.नवले गल्ली) हा 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सहा महिन्यांपासून पाठलाग करत होता. तिच्या मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून तिचा विनयभंग केला म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये भा. दं. वि. कलम 354 ड, 509, 506 व पोक्सो कायद्यातील कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, योगेश पवार याने 06 महिन्यांपासून तिचा पाठलाग केला, तसेच 27 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मोबाईलवर इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वतचे नग्न फोटो पाठवले. तसेच आरोपीने तू मला आवडतेस, आपण लग्न करू, आपण रूम घेऊन भेटू असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली.
यावर सदर अल्पवयीन मुलीने नकार दिला असता योगेश पवारने तिला शिवीगाळ करून कोणाला काही सांगू नको, नाहीतर बघून घेण्याची तिला धमकी दिली. त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना त्याच्या कृत्यांबद्दल सांगितले. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी काल संध्याकाळी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली.