अहिल्यानगर/श्रीगोंदा |प्रतिनिधी| Ahilyanagar| Shrigonda
श्रीगोंदा शहरात प्रतिबंधित असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करणारा सराईत गुन्हेगाराविरोधात एमपीडीए कायद्यान्वये जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्थानबध्दतेचे आदेश काढले आहेत. आतिक गुलामहुसेन कुरेशी (वय 34, रा. खाटिक गल्ली, श्रीगोंदा) असे त्याचे नाव असून, स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पकडून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रीगोंदा शहरातील खाटीकगल्ली येथील आतिक कुरेशी हा श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत व परिसरात त्याच्या साथीदारांसह प्रतिबंधीत असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून मास विक्री करणे, घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे व दरोडा टाकणे, महिलाचा विनयभंग करणे, बलात्कार करणे, मालमत्ता जबरीने घेणे असे गंभीर स्वरूपाचे व गोहत्या बंदीचे गुन्हे करून सामान्य लोकांवर दहशत निर्माण केली होती.
सराईत गुन्हेगार कुरेशी याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलित कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुर्या व कुचकामी ठरत होत्या. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्फत अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठविला होता. पोलिस अधीक्षक ओला यांनी शिफारस करून प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकार्यांनी त्याला तत्काळ मंजुरी देत सराईत गुन्हेगार कुरेशी याला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने कुरेशी याला ताब्यात घेऊन तत्काळ नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार रवींद्र पांडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, मनोज लातुरकर, अमोल कोतकर, महादेव भांड आदी उपस्थित होते.