श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
येथील एमआयडीसीच्या प्लाटमध्ये राहत असलेल्या एका जणाने त्याच्या मालकाकडून उसणे घेतलेले अडीच लाख रुपये बुडवता यावे म्हणून त्त्याने स्वतःच्याच दहा महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची पहाटे झोपेत गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खूनी पित्यास अटक करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथे राहणारा श्रावण बाळनाथ आहिरे (वय-40) हा आपल्या कुटुंबासह एमआयडीसीतील प्लॉट नंबर बी.4/2 च्या उत्तरेकडील मोकळ्या जागेत मेंढ्या घेऊन राहत होता. त्याने त्याचा मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून 2,50,000/-रुपये घेतले होते. मालकाचे अडीच लाख रुपये बुडविता यावे म्हणून श्रावण बाळनाथ आहिरे याने त्याचा चिमुकला मुलगा सोपान श्रावण अहिरे (वय 10 महिने) याचा पहाटेच्या सुमारास सगळेजण झोपेत असताना गळा दाबून ठार मारले.
या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी करुन घटनेची माहिती घेतली.
याप्रकरणी मयत मुलाची आई सिताबाई श्रावण आहिरे (वय-35) हिने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1-1.591/2021 प्रमाणे श्रावण बाळनाथ आहिरे याचेविरुध्द भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ सुरवाडे करत आहेत.