नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भविष्यातील भीती दाखवून आणि जादूटोण्याचा आधार घेत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’च्या कुकर्मांचा अखेर पर्दाफाश झाला आहे. शिर्डी आणि नाशिकमध्ये (Nahik) दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन असून, तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता एसआयटीने फॉरेन्सिक विभागाशी संपर्क केला असून विभागाने मूळ पुरावे, खरातच्या केबिनमधील द्रव पदार्थ, ग्लास, चॉटल्स, इतर मशिनरी आदी ताब्यात घेऊन पडताळणी सुरु केली आहे.
संशयित अशोककुमार खरात (रा. गोविंदनगर, नाशिक) याने २८ वर्षीय पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) १७मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, तपासादरम्यान १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. यावरून त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओडल्याचा संशय बळावला असून, सध्या या पीडितांचा शोध घेत आहे. शिर्डी पोलिसांत (Shirdi Police) मॉर्फ व्हिडिओबाबत दाखल गुन्ह्यानंतर खरातमागे तपासाचा ससेमिरा सुरू झाला.
शिर्डी पोलिसांत एका पीडितेच्या फिर्यादीवरुन खरातचा ‘ऑफिस बॉय’ नीरज जाधवविरुद्ध फेब्रुवारी २०२६ महिन्याच्या अखेरीस गुन्हा नोंद आहे. हा गुन्हा नोंद होताच पोलीस (Police) दलाने खरातची ‘कुंडली’ संकलित करण्यास सुरूवात केली. त्यामुळे शिर्डी व वावी पोलिसांत दाखल गुन्ह्यांसाठी ‘एसआयटी’ स्थापन झाली. त्यातच नाशिकमध्ये पीडितेने पुढाकार घेत खरातचे कुकर्म उघड केल्याने हा गुन्हादेखील एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, ऑफिस बॉय नीरज याची कसून चौकशी एसआयटीने केली आहे.
प्रकरण १ : खरातकडे खंडणी (२९ डिसेंबर २०२५)
पोलिस ठाणे वावी (नाशिक ग्रामीण)
फिर्यादी – अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन
संशयित – दिनेश मनाजी परब (रा. भायखळा, मुंबई) व राजेंद्र अशोक जासूद (रा. पुणे)
हकीकत- परबने खरातला २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत
व्हॉट्सअॅपवर संपर्क साधत जासूद याच्याकडे खरातचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असे सांगितले. समाजात बदनामी करण्याची धमकी देत ‘सेटलमेंट’ करण्यासाठी संशयितांनी ५ कोटी रुपये मागितले. खरातने हे फोटो खोटे असल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे
प्रकरण २ : महिलेचा ‘मॉर्फ व्हिडिओ (फेब्रुवारी २०२६)
पोलिस ठाणे – शिर्डी (अहिल्यानगर)
फिर्यादी २४ वर्षीय पीडिता
संशयित नीरज जाधव व इतर
हकीकत- संशयिताने पीडितेच्या व्हॉट्सअॅपवर ‘एआय’ द्वारे बनवलेले किंवा ‘मॉर्फ’ केलेले अश्लील फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेला एका अनोळखी व्यक्तिने संशयिताकडे तिचे फोटो असल्याचे सांगितले. नीरज हा खरातच्या ऑफिसमध्ये कार्यरत होता त्याने पीडितेला धमकाविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
प्रकरण ३ : महिलेवर अत्याचार व जादूटोणा (१७ मार्च २०२६)
पोलिस ठाणे- सरकारवाडा (नाशिक शहर)
फिर्यादी २८ वर्षीय पीडिता
संशयित – अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन
हकीकत खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र-तंत्र आणि धार्मिक विर्थीच्या नावाखाली पीडितेचा विश्वास संपादन केला. पीडितेला गुंगीकारक पदार्थ देत, तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि जीवे मारण्याची धमकी देत नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शनिवारी (दि. २१) काय घडले?
- संशयित खरातची वैद्यकीय तपासणी
- ६ तासांपेक्षा अधिक वेळ कसून चौकशी
- खरातचे कार्यालय, बंगला, संस्थांनातील सीसीटीव्हींची तपासणी
- खरातच्या घरझडतीतून जप्त लॅपटॉप, हार्ड डिस्कची तपासणी
- खरात व इतर संशयितांची ‘कॉल डिटेल्स रेकॉर्ड’ तपासणीस
- वावी खंडणी प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेतल्याची चर्चा
- मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे याला ताब्यात घेतल्याची चर्चा, ‘एसआयटी’ चा दुजोरा नाही.
- नाशिक शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी ‘एसआयटी’ तपासापासून दूर.
- ‘एसआयटी’ मध्ये नाशिक शहर, ग्रामीण व अहिल्यानगरातील महिला पोलीस निरीक्षकांचा समावेश.
- गोपनीयतेसाठी ‘एसआयटी’ मार्फत खासगी वाहनांचा वापर.
- ‘एसआयटी’ प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांना भेटण्यासाठी अहिल्यानगर, शिर्डी, नाशिकमधून ग्रामस्थ पोहोचले




