Sunday, November 24, 2024
Homeक्राईमचाकूने वार करून परप्रांतीय युवकाचा खून

चाकूने वार करून परप्रांतीय युवकाचा खून

तपोवन रस्त्यावरील घटना || खूनी परप्रांतीय युवक अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना तपोवन रस्त्यावरील ढवण वस्तीवर मंगळवारी (1 ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अमन हरिश्चंद्र सतनामी (वय 21 मूळ रा. सतनाम चौक, वॉर्ड नंबर 9, बलोदाबाजार, छत्तीसगड, हल्ली रा. सद्गुरू टॉवर, सुनील ढवण यांच्या विटभट्टीजवळ, तपोवन रस्ता, सावेडी) असे मयत युवकाचे नाव आहे. शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या रागातून ही घटना घडली आहे.
या प्रकरणी खुनी परप्रांतीय युवक मनीष उर्फ पुकु तिरीथ निशाद (मूळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. तपोवन रस्ता) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेमंत रमेश भारव्दाज (वय 24 मूळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. तपोवन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबासह सुनील ढवण यांच्या विटभट्टी जवळ राहतात. त्यांच्या शेजारील खोलीत त्यांचा आत्याचा मुलगा अमन हरिश्चंद्र सतनामी तसेच दुसर्‍या खोलीत रामजी बलवंत निशाद व त्यांचा नातू मनीष उर्फ पुकु तिरती निशाद हे राहतात. ते सर्वजण बिगारी काम करतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्व जण जेवण करून घराबाहेर बसलेले होते. त्यावेळी शेजारी राहणारा मनीष निशाद मोठ मोठ्याने शिवीगाळ करत होता. त्यामुळे फिर्यादीच्या आत्याचा मुलगा अमन हा मनीष याला ‘तू मोठ्याने शिवीगाळ करू नकोस, आमच्या घरात महिला आहेत’ असे म्हणाला.

त्याने अमन यांना देखील शिवीगाळ केले व घरात जावून चाकू आणला व तो अमन यांच्या पोटात मारून त्यांना जखमी केले. सदरची घटना घडल्यानंतर मनीष हा जवळच असलेल्या ऊसातून पळून गेला. जखमी अमन यांना फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सावेडीतील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खूनी मनीषचा शोध घेतला असता तो शेंडी बायपास जवळ मिळून आल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कोकरे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या