पुणे |प्रतिनिधी| Pune
अनैतिक संबंधातून एका 35 वर्षीय व्यक्तीचा तरुणीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या व लग्नास नकार देणाऱ्या विवाहित प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने जे कृत्य केले आहे. संबधित तरुणीने प्रियकराला लॉजवर बोलवत ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला.
याप्रकरणी संबंधित महिलेला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील व्हाईट हाऊस लॉजिंग व बोर्डिंग येथील रुम नं. 307 मध्ये घडली.पैगंबर गुलाब मुजावर (35 रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत पैगंबर मुजावर याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.14) सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर आणि महिला आरोपी हे दोघेजण पूर्वी एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. फिर्यादीचा पती हा आरोपी तरुणीला भेटायला जात नाही. तसेच लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून त्याचा महिला आरोपीशी वाद होत होता. तरुणीने पैगंबर याला शुक्रवारी
चिंचवड स्टेशन येथील व्हाइट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. रात्री दहा वाजताच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचे लॉज मधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैगंबर यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संशयावरून पोलिसांनी पैगंबर याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने खूनाची कबुली दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे याप्रकरणी तपास करीत आहेत.