अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वाहन व पैशाच्या व्यवहारातून लोखंडी रॉड, दांडके व पाईपने हल्ला करून तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना रेल्वे स्टेशन गेट, बंधूप्रेम हॉटेलजवळ घडली. प्रकाश राजू लोखंडे, चंद्रकांत अशोक सातपुते, अमोल किशोर खोमणे (पत्ता नाही) हे तिघे हल्ल्यात जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमी चंद्रकांत अशोक सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ ते दहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा पेटारे, मास्टर पेटारे, विजय गायकवाड, अक्षय तांदळे, सुरेश नन्नवरे (पूर्ण नाव, पत्ता नाही) व त्यांचे इतर चार ते पाच साथीदार यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी (11 जुलै) रात्री फिर्यादी चंद्रकांत सातपुते व त्यांचे साथीदार अमोल किशोर खोमणे, प्रकाश राजू लोखंडे हे रेल्वे स्टेशन गेट परिसरातील बंधुप्रेम हॉटेलजवळ असताना दादा पेटारे, मास्टर पेटारे, विजय गायकवाड, अक्षय तांदळे, सुरेश नन्नवरे व त्यांचे इतर चार ते पाच साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, लाकडी दांडके व लोखंडी पाईप होते. त्यांच्यात वाहन व पैशाच्या व्यवहारातून वाद झाले. या वादातून दादा पेटारे व इतरांनी फिर्यादीसह तिघांवर रॉड, दांडके व पाईपने हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.
शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, जखमी तिघांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर चंद्रकांत सातपुते यांनी शनिवारी (13 जुलै) दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.