राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी परिसरातील एका पाच वर्षीय मुलीला एका तरुणाने त्याच्या घरात नेऊन तिच्या सोबत अश्लिल चाळे केल्याची घटना 24 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला दि. 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान कामानिमित्त घरातून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची पाचवर्षीय नात घरात एकटीच खेळत होती. सदर महिला काही वेळातच घरी गेल्या असता त्यांची नात घरात दिसली नाही. त्यावेळी त्यांनी तिचा शोध घेतला. एका घराच्या दरवाजातून डोकावले असता त्या घरातील तरुण त्या पाच वर्षीय मुलीसोबत अश्लिल चाळे करत असताना दिसून आला.
त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याला हाताने मारहाण केली. त्याचवेळी या तरुणाने फिर्यादी महिलेला फायटरने मारहाण केली. हा आरडाओरडा ऐकून त्या तरुणाची आई तेथे आली आणि तिने फिर्यादी महिलेला शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेत फिर्यादी महिलेच्या डोक्यात मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर फिर्यादी महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजेंद्र गुंजाळ व माधुरी राजेंद्र गुंजाळ या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115 (2), 351 (2), 352 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8, 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत.