नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दैवीशक्तीचा बनाव आणि भविष्याची भीती दाखवून अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोककुमार खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या साम्राज्याचे एकामागून एक थरकाप उडवणारे पदर उलगडू लागले आहेत. सोमवारी (दि. २३) खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) आणखी तीन महिलांनी धाडस दाखवत तक्रारी नोंदवल्याने, अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आज मंगळवारी (दि. २४) एसआयटी त्याला न्यायालयात हजर करणार आहे.
एसआयटी प्रमुख पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (दि. २३) थेट खरातच्या कॅनडा कॉर्नरवरील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयावर धाड टाकली. यावेळी पीडित महिलांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सूत्रांनुसार, या कार्यालयातून अनेक संशयास्पद वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुराव्यांचे संकलन शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे यासाठी फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेतली जात आहे. खरातने या ठिकाणी महिलांना बोलावून त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. कॅप्टन खरात हा केवळ भोंदूगिरीवर थांबला नाही तर तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर येते आहे.
सध्या एसआयटी (SIT) एकूण आठ वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करत असून, यामध्ये आर्थिक फसवणुकीचा पदर तपासला जाणार आहे. तर, या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. खरातवर आता जमिनीच्या वादातून ‘सुपारी देऊन हत्या’ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. नाशिकचे कैलास जाधव आणि खरात यांच्यात कायदेशीर वाद सुरू होता. दरम्यान, १७ डिसेंबर २०२२ रोजी जाधव यांचा रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला. हा अपघात नसून खरातने रचलेला एक सुनियोजित कट असल्याचा दावा विलास जाधव यांनी केला आहे. अंबड पोलिसांकडे दिलेल्या अर्जात त्यांनी खरात आणि अपघात करणाऱ्या कार चालकाच्या संबंधांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एसआयटी कोठडी मागणार
१८ मार्चपासून शहर पोलिसांसह एसआयटीच्या ताब्यात असलेल्या खरातची कोठडी आज संपत आहे. दुपारी त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः तपासातील प्रगती आणि हाती लागलेले धक्कादायक पुरावे न्यायालयासमोर मांडणार आहेत. गुन्ह्याचे स्वरूप पाहता आणि नवनवीन पीडिता समोर येत असल्यामुळे, एसआयटी खरातच्या कोठडीत वाढ करण्याची आग्रही मागणी करण्याची दाट शक्यता आहे.
घाबरू नका, पुढे या!
या नराधमाच्या तावडीत अजूनही अनेक जण अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी ज्या महिला किंवा नागरिकांची खरातने फसवणूक पकिंवा लैंगिक छळ, अत्याचार, भीती दाखविली आहे, त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल., असे स्पष्ट केले आहे. एसआयटीने तक्रारीसाठी ९५०३२७०२२४ व ७७७५८१६३८९ हे संपर्क क्रमांक जारी केले आहेत.





