Saturday, July 27, 2024
Homeनगरमुलीच्या प्रेमाचा धंदा करणार्‍या आईवर अखेर गुन्हा दाखल

मुलीच्या प्रेमाचा धंदा करणार्‍या आईवर अखेर गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के या सिव्हील इंजिनिअरने गळफास लावून नुकतीच आत्महत्या केली होती. मयत सुमितच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एक तरुणी व तिच्या आईच्या विरोधात काल अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मयत सुमित मंगेश शिर्के याचे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील तरुणीशी प्रेमसंबध होते. या दोघांचे पाच ते सहा महिने प्रेमसंबंध सुरू राहिल्यानंतर या प्रेम प्रकरणातील मुलीने व तिच्या आईने सुमितकडे पैशासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली होती.

सुमित हा सिव्हील इंजिनिअर होता. मात्र करोना काळात त्याचे हातचे काम गेले होते. त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. मोठा भाऊ व त्याची आई देईल तेवढेच मोजके पैसे त्याच्याकडे असत. त्यातच आपली प्रेयसी व तिची आई पैशासाठी सातत्याने तगादा लावत असल्याने तो मानसिक तणावाखाली होता. हजार दोन हजार रुपये त्याने अनेकदा त्यांना दिले. मात्र त्यांची पैशाची भूक जास्तच वाढत गेल्याने सुमितचे टेन्शन वाढले होते.त्यातच 8 ऑगस्ट रोजी त्याच्या प्रेयसीची आई कळस बुद्रुक येथे त्याच्या घरी आली. यावेळी तिने त्याच्याकडे व त्याच्या आईकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.

मात्र सुमितकडे व त्याच्या आईकडे एवढी रक्कम नसल्याने दोघांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही जर मला पैसे दिले नाहीतर तुम्हाला कोर्ट कचेर्‍या करायला लावील, अशी धमकी तिने दिल्याने, सुमित हा खूपच मानसिक तणावाखाली गेला.आपल्या घरी येऊन राडा घातल्याने सुमितच्या पायाखालची वाळू सरकली होती. आता एवढे पैसे आणायचे कुठून ? आपल्या मोठ्या भावाकडून इतकी मोठी रक्कम तो मागू शकत नसल्याने तो खूपच मानसिक तणावाखाली होता.

सोमवार दि.9 ऑगस्ट रोजी सुमितची आई नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता सुगाव येथील नर्सरीत कामासाठी गेली. यावेळी सुमित हा घरी एकटाच होता. गावातून फेरफटका मारून आल्यानंतर तो आपल्या घराचे दार लावून बंद करून बसला होता. यावेळी दुपारच्या सुमारास सुमितचे व त्याच्या प्रेयसीचे व्हॉट्सअ‍ॅपला बोलणे सुरू होते. यावेळी त्याच्या प्रेयसीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. तसेच तू आज काही करून मला पैसे पाठव अन्यथा मला दुसरा निर्णय घ्यावा लागेल, अशी धमकी तिने सुमितला दिली. त्यातच प्रेयसीने तिच्या घराशेजारील विहिरीचे फोटो काढून त्याला पाठविले. तू जर मला पैसे पाठविले नाही तर मी या विहिरीत उडी मारून जीव देईल, अशी धमकी देखील दिल्याने सुमित खूपच गरबडून गेला. यावेळी सुमितने मागचा पुढचा विचार न करता त्याने आपल्या घरातील टिव्हीचा आवाज मोठा करीत घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

हा प्रकार सुमितची आई घरी आल्यानंतर उघडकीस आला. त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यूला घुलेवाडी येथील महिला व तिची मुलगीच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव आज अकोले पोलीस ठाण्यात उशिरा फिर्याद दाखल करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अकोले पोलीस ठाण्यात सविता मंगेश शिर्के यांच्या फिर्यादीवरून एक महिला व तिच्या मुलीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या