ठाणे | Thane
येथील मानपाड्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांची काल (मंगळवारी) रात्री गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) करण्यात आली आहे. पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात बसले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर पूर्णेकर यांना तातडीने ठाण्यातील (Thane) कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दोघांना घेतले ताब्यात
दरम्यान या घटनेप्रकरणी ठाणे पोलिसांनी (Thane Police) आतापर्यंत पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी जुन्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप देखील मयत पूर्णेकरांच्या कुटुंबीयांनी (Family) केला आहे. जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक (Arrested) होत नाही तोपर्यंत प्रदीप पूर्णेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका पूर्णेकर कुटुंबाने घेतली आहे.
प्रदीप पुर्णेकरांचा मुलगा काय म्हणाला?
घटनेनंतर माध्यमांशी बोलताना प्रदीप पुर्णेकरांचा मुलगा म्हणाला की “या हत्येमागे काय कारणे आहेत याची मला कल्पना नाही. निवडणुकीमुळे, पक्षामुळे कशामुळे हत्या झाली, काही माहित नाही. माझ्या वडिलांनी खूप वेळा सर्वांसाठी सर्व काही केले. दुसऱ्यांची नशा सोडवण्यासाठी प्रयत्न केले. या हत्येमागे ड्रग माफिया किंवा कोणीही असू शकतो. मला मुख्यमंत्र्यांना एवढच सांगायचं आहे की, माझ्या वडिलांना न्याय द्या. जे कोणी यामागे आहेत, त्या सर्वांना अटक करा, अशी मागणी त्याने केली.
सीसीटीव्ही फुटेज समोर
प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येनंतर घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबार होतानाचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. तर दुसऱ्या सीसीटीव्हीत जखमी प्रदीप पूर्णेकरांना रुग्णालयात नेत असतानाची दृश्य आहेत. घटनेच्या आधी रेकी करून आरोपी मैदानाकडे गेले. त्यानंतर एकाने सिग्नल दिल्यानंतर तोंडाला रुमाल बांधून संशयित आरोपी पुन्हा मैदानातून ऑफिसकडे गेले. तेथे प्रदीप पूर्णेकरांवर हल्ला केल्यानंतर घटनास्थळाहून पळ काढताना दिसत आहेत.




