वैजापूर । प्रतिनिधी
तालुक्यातील कापूस वाडगाव येथील ३० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. भारती संतोष थोरात असे या घटनेतील मयत विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहितेला ९ वर्षाचा मुलगा व ७ वर्षांची मुलगी आहे.
या घटनेबाबत नातेवाईकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ११ वर्षा पूर्वी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव येथील भारती हीचा विवाह कापूसवाडगाव येथील संतोष थोरात यांच्या सोबत झाला होता. भारतीचे आपल्या सासूसोबत वाद होत असल्याने काही महिन्यांपूर्वीच ती आपल्या पतीसोबत विभक्त राहत होती. मात्र रविवारी सकाळी अचानक तिच्या माहेरच्या नातेवाईकांना सासरच्या मंडळींचा फोन व भारती ही हात पाय हलवत नसल्याने तिला रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले.
सासरच्या मंडळींनी भारतीला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारतीला तपासून मृत घोषित केले.यानंतर माहेरकडील नातेवाईक यांनी वैजापूर येथे आल्यावर त्यांना भारतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र मृत्यूचे कारण अस्पष्ट होते व भारतीच्या गळ्यावर निशाण असल्याचे त्यांना दिसले. भारतीचा घातपात झाला असून सासरच्या मंडळींनी तिला जिवे मारले असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी उपजिल्हा रुग्णालयात पाहणी करत पंचनामा केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कसा झाला ते समोर येईल. मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी ही खळबळजनक घटना घडल्याने मुलीच्या नातेवाईकांनी ही दिवाळी आम्हाला नेहमीच लक्षात राहील असा हंबरडा फोडला.