अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव परिसरातील दिपनगर येथे एका तरूणाला काही कारण नसताना सहा जणांनी एकत्र येऊन मारहाण केली. अविनाश अशोक भिंगारदिवे (वय 25 रा. दिपनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश क्षेत्रे, सुमित शिंदे, रोहन क्षेत्रे, अमित शिंदे, मंगेश कांबळे व अनिकेत घोडके (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. दिपनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (6 एप्रिल) रात्री 11.45 वाजेच्या सुमारास अविनाश दिपनगर येथून आपल्या घरी जात असताना ही घटना घडली.
अविनाश यांनी सांगितले की, दिपनगर परिसरात संशयित सहा जण हातात लाकडी दांडे व गज घेऊन आरडाओरड करत उभे होते. मी काय झाले आहे हे पाहण्यासाठी थांबलो असता त्यांनी मला विचारले की, इथे का थांबलास? तुझे काय काम आहे? मी त्यांना सांगितले की, माझे काही काम नाही. एवढ्यावरून त्यांनी मला शिवीगाळ करत अचानक मारहाण सुरू केली. रोहन क्षेत्रे याने लाकडी दांडक्याने, इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. मी मोठ्याने आरडाओरड केल्यावर संशयित आरोपींनी तेथून पळ काढला, असे भिंगारदिवे यांनी सांगितले. घटनेनंतर त्यांनी आपल्या भावास संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते कोतवाली पोलीस ठाण्यात गेले व फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.