Sunday, October 4, 2026
Homeक्राईमCrime News : हॉटेलमधील किरकोळ वादातून तरूणाचा खून

Crime News : हॉटेलमधील किरकोळ वादातून तरूणाचा खून

मध्यस्थी करणार्‍या मित्रावरही जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी (ता. नगर) शिवारातील एका बिलाच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान तरूणाच्या खुनात झाले. तर वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या दुसर्‍या तरूणावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी (21 जून) रात्री घडली. याप्रकरणी भिंगारमधील अल्पवयीन मुलाविरूध्द (वय 16) खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोमवारी (22 जून) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात नीलेश गायकवाड (वय 32, रा. भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपले मित्र सागर गंगाधर धोत्रे आणि नीलेश मधू चावरे (दोघे रा. भिंगार) यांच्यासोबत रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बाराबाभळी परिसारातील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

- Advertisement -

जेवण झाल्यानंतर तिघेही हॉटेलच्या काउंटरजवळ उभे असताना त्यांचा परिचित अल्पवयीन मुलाचा हॉटेल मॅनेजरसोबत पैशांच्या कारणावरून वाद सुरू होता. वाद सुरू असताना सागर धोत्रे याने मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत मित्रा, कशाला वाद करतो, त्यांचे पैसे देऊन टाक असे सांगितले. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या मुलाने सागरला शिवीगाळ करत त्याच्याशी हुज्जत घातली. दोघांमध्ये बाचाबाची वाढल्यानंतर मुलाने सागरला धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी सागरनेही जवळील रिकामा पाण्याचा जार मुलाच्या दिशेने फेकून मारला. दरम्यान, चावरे व फिर्यादी नीलेश गायकवाड हे दोघेही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करीत असताना मुलाने चाकू काढून नीलेश चावरे यांच्या गळ्याजवळ वार केला.

या हल्ल्यात चावरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर मुलाने तोच चाकू सागर धोत्रे यांच्या छातीत खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. घटनेनंतर जखमी नीलेश यांना त्यांच्या भावाच्या मदतीने तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या सागर धोत्रे यांना रूग्णवाहिकेव्दारे जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे भिंगार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खूनी अल्पवयीन मुलाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...