भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती भागवताचार्य सेवानाथ महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून ‘तुझ्या मालकीची खोली फिर्यादीला दे नाही तर तीन लाख रुपये दे अन्यथा आणखी विनयभंगाचा गुन्हा दाखल करू’ असे धमकावण्याचा प्रकार आळंदी येथे घडला. याप्रकरणी आळंदी येथील चौघांविरुद्ध आळंदी पोलिसांत दमदाटी केल्याचा व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरख महाराज आहेर यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती म्हणून सेवेत असलेले भागवताचार्य सेवानाथ महाराज यांचे आध्यात्मीक शिक्षण आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत झाले. त्यानंतर ते सहा वर्षे भंडारा डोंगरावर एकांतात राहिले. नंतर तेथून आल्यानंतर भजन, किर्तन व प्रवचन अशी अध्यात्मीक सेवा सुरू झाली. त्यातून त्यांनी आळंदी जवळील केळगाव येथे एका जोडीदारासोबत एक गुंठा जागा घेतली. त्यावर बांधकाम केले. पण काही वर्षानंतर खोकर येथील चौरंगीनाथ महाराज यांचे देहावसान झाले. त्यानंतर तुकाराम महाराज बोडखे यांचे नामकरण वै. चौरंगीनाथ महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून सेवानाथ महाराज असे नामकरण झाले तेव्हापासून महाराजांचे वास्तव्य खोकर येथे आहे.
या दरम्यान त्यांचे खोलीत काही दिवस त्यांचे बंधु सोमनाथ यांचे वास्तव्य होते. परंतु शेजार्यांच्या त्रासाला कटाळून ते तेथून निघून आले आणि शेजार्यांना रान मोकळे झाले. त्यांनी महाराजांच्या खोलीत असलेले एक लाख रूपये किंमतीचे ग्रंथ, पाच पक्वाज, पाच होर्मोनियम व नित्य उपायोगाच्या वस्तू असे मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास करत खोलीचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात यातील एका महिलेने सेवानाथ महाराजांविरूद्ध दि.4 जुलै 2019 रोजी आळंदी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना धमकाविण्यास सुरूवात झाली.
त्यानंतर दि.1 डिसेंबर रोजी सेवानाथ महाराज हे आळंदी येथे गेले असता तेथे यातील गोरख महाराज आहेर याने सर्वांसमक्ष ‘तुझ्या मालकीची रूम एका महिलेस देऊन टाक, तुला खोली द्यायची नसेल तर त्या बदल्यात आम्हाला तीन लाख रूपये देऊन टाक, मी त्या महिलेला तुझ्या विरूद्धची विनयभंगाची दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगतो’ असे म्हणाला.
त्यावर महाराजांनी ‘मी त्या महिलेचा विनयभंग केला नसून न्यायालयात जो न्याय होईल तो मला मान्य असेल असे’ असे सुनावले. एकंदरीत ‘तुमची रूम द्या अन्यथा तीन लाख रूपये द्या’ आम्ही विनयभंगाचा गुन्हा मागे घेवू असे धमकावत महाराजांना खंडणी मागितली. याप्रकरणी आळंदी पोलिसात आळंदी येथील दोन महिला व अंबादास लक्ष्मण येल्हांडे व गोरख महाराज आहेर या चौघाविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी पोलिसांत वरील चौघाविरूद्ध भादंवि कलम 448, 384, 506 व 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वरील पैकी गोरख महाराज आहेर यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे करत आहेत.
दरम्यान, याबाबत काल व्हॉट्स्अॅपवर महाराजांची मुलाखत व्हायरल झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच काल सायंकाळी खोकर येथील गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती भागवताचार्य सेवानाथ महाराज हे स्वत: खोकर येथे दाखल होत पत्रकारांशी संपर्क करत सर्व घटना कथन केल्याने त्या चर्चा थंडावल्या.